For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्म ईश्वराला अर्पण केलं नाही तर ते बंधनकारक होते

06:53 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्म ईश्वराला अर्पण केलं नाही तर ते बंधनकारक होते
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, आत्मज्ञानाशिवाय इंद्रियजय साधला जात नाही हे समजल्यावर साधक कदाचित निराश होण्याची शक्यता असते कारण आत्मज्ञान प्राप्त होणे ही किती दुरापास्त गोष्ट आहे हे तो जाणून असतो. म्हणून इंद्रियजय साधण्यासाठी दुसरी आणि लगेच अंमलात आणता येईल अशी युक्ती म्हणजे माणसाने वाट्याला आलेली कर्मे निरपेक्षतेनं करायला सुरवात करावी. ह्यात अडचण अशी येते की, वाट्याला आलेलं काम सर्वांच्या आवडीचं असतंच असं नाही. तरीही वाट्याला आलंय ना मग ते करायचं तेही निरपेक्षतेनं. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? नसेल तर मी सांगतोय म्हणून का होईना ते करायचं हे तत्व लक्षात ठेव कारण नावडते कर्म मी करणार नाही असं जो म्हणतो त्याला संपूर्ण कर्मत्याग शक्य होत नसतो. म्हणून कर्मत्याग करण्याच्या भानगडीत न पडता वाट्याला आलेलं कर्म निरपेक्षतेनं करावं हे सगळ्यात उत्तम. त्यानं कर्मयोग साधला जातो. त्यातून पापपुण्याचा कर्मबंध निर्माण होत नाही. म्हणजेच कर्मबंधातून मुक्त झाल्यामुळे मनुष्य जिवंतपणीच मोक्षस्थिती अनुभवू शकतो. इथपर्यंतच बाप्पाचं सांगणं आपण समजून घेतलं. पुढं बाप्पा सांगतायत की, निरपेक्षतेने केलेलं कर्म मला अर्पण करून टाक.

असमर्प्य निबध्यन्ते कर्म तेन जना मयि ।

Advertisement

कुर्वीत सततं कर्मानाशो सङ्गो मदर्पणम् ।।8।।

अर्थ- कर्म मला अर्पण न केल्याने ते मनुष्यास बंधनकारक होते म्हणून. आशारहित व आसक्तिरहित होऊन नेहमी कर्म मला अर्पण करावे.

विवरण- लहानपणी मनुष्य आईवडिलांनी सांगितलेली कर्मे बिनबोभाट करत असतो. मग ती आवडत असतील वा नसतील. शाळेत शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासही मनुष्य निमूटपणे करत असतो पण शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला आपण कोणीतरी महान व्यक्ती झाल्याचा साक्षात्कार होतो आणि करतोय ते सगळंच बरोबर आहे असं त्याला वाटू लागतं. त्यामुळे तो करत असलेल्या कर्माचा तो स्वत: कर्ता आहे असं समजतो आणि त्याच्या यशापयशाची काळजी वाहण्यात आयुष्य खर्ची घालतो. प्रत्यक्षात प्रत्येकाच्या जीवन नौकेचे नावाडी ईश्वर स्वत: असतात आणि बाप्पा हे ईश्वराचं सगुण रूप आहेत म्हणून बाप्पा म्हणतायत लहानपणी किंवा विद्यार्थीदशेत तू किती मुक्त होतास ते आठव आणि मोठेपणी आपण कर्ते आहोत ह्या वृथाभिमानाने किती चिंतेत काळ घालवतोयस तेही लक्षात घे. स्वत:ला कर्ता समजण्याची चूक करू नकोस म्हणजे तुझे मोठेपणही अगदी आनंदात जाईल.

उपजीविकेसाठी मनुष्य नोकरी करतो. नोकरीच्या ठिकाणी वेळेवर जातो. तेथील मालकांनी किंवा साहेबांनी सांगितलेले काम निमूटपणे करतो. या कामाची आवश्यकता आहे का? ज्या पद्धतीने किंवा ज्या क्रमाने तो काम करतोय ती पद्धत, तो क्रम बरोबर आहे का? असला कसलाही विचार तो करत बसत नाही. दिलेलं काम करायचं आणि मोकळं व्हायचं असा त्याचा खाक्या असतो. त्यातून होणाऱ्या नफानुकसानीची चिंता मालकाने किंवा साहेबानी करायची हे नोकराच्या डोक्यात पक्कं बसलेलं असतं. त्याप्रमाणे ईश्वराने दिलेलं काम हे त्याचंच असतं आणि आपल्यावर ते त्यानं सांगितल्याप्रमाणे करायची जबाबदारी असते. मग ते सुरू झालं की, ईश्वराला सांगून टाकायचं की, बाबा तू नेमून दिल्याप्रमाणे काम सुरु केलंय. पूर्ण करून घ्यायचं की, अर्धवट ठेवायचं हे तू ठरवायचंस. पुढं त्याचं काय करायचं ते तू बघ. तू काम करायची जेव्हढी प्रेरणा देशील तेव्हढ काम केलं की, माझी जबाबदारी संपली. ह्याच्या यशापयशाचा तूच धनी आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा निर्णय घे. यालाच कर्म ईश्वराला अर्पण करणे असं म्हणतात. आपण करत असलेलं कर्म ईश्वराचे असून ते करून झाल्यावर त्याला अर्पण करायचे आहे हे लक्षात राहण्यासाठी कर्म करत असताना सतत ईश्वराचे स्मरण करावे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.