आत्मज्ञानी मनुष्य संतुष्ट असल्याने त्याला कर्म बाधत नाही
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, ज्ञात्याच्या मनाची समोर दिसतंय त्यातलं आपलं काहीच नाही याची खात्री असल्याने तो सदैव निर्विचार असतो व आत्मानंदात मग्न असतो. असा मनुष्य कायम समाधानी असतो. सामान्य माणसाला इंद्रिये त्यांच्या हातातले बाहुले बनवत असतात. त्याला निरनिराळी आकर्षणे दाखवून फशी पाडत असतात पण ज्ञानी मनुष्य त्यांच्यावर अधिकार गाजवून त्यांना त्याच्या हुकमतीत ठेवत असतो. म्हणून त्याला जितेंद्रिय असे म्हणतात. श्री मारुतीरायांची वैशिष्ट्यो सांगताना बुध कौशिक ऋषीनी रामरक्षेमध्ये ते जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं होते असे सांगितले आहे ते ह्याच हेतूने. ज्याने इंद्रिये जिंकलेली असतात तो समबुद्धीने वागत असल्याने बुद्धिमत्तेत श्रेष्ठ असतोच.
आत्मज्ञानी माणसाला कोणत्याही गोष्टींचा साठा करून ठेवावा असंही वाटत नसतं. त्याला खात्री असते की, भगवंतांनी गीतेत वचन दिल्याप्रमाणे आपला योगक्षेम ईश्वर चालवत आहेत. त्यामुळे जीवनात आपल्याला काहीही कमी पडणार नाही. अशा लोकांना भगवंतांनी भरपूर दिलं नाही तरी तो त्यांची लाज राखतो. अशा मनुष्याने उदरनिर्वाह होईल इतपत जरी कर्म केलं तरी पुरेसं होतं. अधिक कोणतीही काम त्यानं केली नाहीत तर ती त्यानं टाळली असं म्हणता येत नाही कारण कुटुंबियांप्रति असलेलं कर्तव्य त्यानं पार पाडलेलं असतं. सबब त्याला कर्म टाळण्याचे पातक लागत नाही. तो संपूर्णपणे ईश्वरावर अवलंबून असल्याने मी अमुक एक करीन असा संकल्प तो करत नाही. आता मला स्वत:हून काही करायचं उरलंच नाही अशी त्याची ठाम भूमिका असते. कर्तव्य म्हणून जे कर्म तो करत असतो त्यामुळे तो कदापि बद्ध होत नाही असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
अद्वन्द्वो मत्सरो भूत्वा सिद्ध्यसिद्ध्यो समश्च य ।
यथाप्राप्त्येह संतुष्ट कुर्वन्कर्म न बध्यते ।। 28 ।।
अर्थ-सुख व दु:ख या द्वंद्वाने रहित व मत्सररहित होऊन आणि सिद्धि व असिद्धि यांचे ठिकाणी समान होऊन जे प्राप्त होईल त्यामध्ये संतुष्ट असणारा कर्म करीत असला तरी बद्ध होत नाही.
विवरण-समोर दिसणारे जग मिथ्या आहे हे जाणून असल्याने निरपेक्ष कर्म करणारा मनुष्य ईश्वराने दिलेलं काम पूर्ण झालं तर सुखी होतो किंवा अपूर्ण राहिलं तर दु:खी होतो असं कधी घडत नाही कारण कर्म केल्यावर मला अमुक एक मिळेल किंवा केलं नाही तर मिळणार नाही हे विचार त्याच्या मनात येत नसतात. करत असलेल्या कर्माकडून त्याला काहीच अपेक्षा नसते. मग त्यापासून सिद्धी मिळाव्यात इत्यादि जास्तीच्या अपेक्षा तर दूरच राहतात. एखादी गोष्ट मिळाली काय आणि नाही काय त्याला काहीच फरक पडत नाही. इतक्या निर्विकारपणे कर्म केल्यावर त्याच्या पाप पुण्याचा त्याच्याशी दुरान्वयाने देखील संबंध येत नसल्याने तो त्यासंबंधाने बद्ध होत नाही.
बाप्पा पुढील श्लोकात सांगतात की, तो करत असलेले कर्म केवळ कर्तव्य म्हणून तो करत असतो त्यामुळे त्यांची कर्मे नि:शेष लय पावतात.
अखिलैर्विषयैर्मुक्तो ज्ञानविज्ञानवानपि ।
यज्ञार्थं तस्य सकलं कृतं कर्म विलीयते ।।29 ।
अर्थ- सर्व विषयांपासून मुक्त व ज्ञान आणि विज्ञान अनुभवयुक्त ज्ञान यांनी युक्त अशा मनुष्याचे सर्व कर्म यज्ञार्थ होते. त्याने केलेल्या सर्व कर्माचा लय होतो.
विवरण-आपण ईश्वराचे अंश असून समोर जे जे दिसतंय ती सर्व ईश्वराची माया आहे हे जो जाणतो तो जीवन्मुक्त असतो. बऱ्याच लोकांना हे माहीत असतं पण हे नुसतं माहीत असून भागत नाही त्यानुसार कृती घडावी लागते. मोह, माया तसेच इतर षड्रिपूंच्या प्रभावाखाली न येता जीवन जगता यायला हवं. सगळ्यांच्याकडं सारख्या नजरेनं पहायला यायला हवं.
क्रमश: