ज्या कर्माने जीव बांधला जातो त्याच कर्माने त्याची मुक्ती होते
अध्याय तिसरा
कर्मयोगाचे आचरण करून आत्म्याचे परमात्म्याशी मिलन साधून देणारा योग बाप्पांनी विष्णूला प्रथम सांगितला. नंतर विष्णूने तो सूर्याला सांगितला. सूर्याकडून तो मनूला समजला आणि मनुकडून तो महर्षींनी जाणून घेतला. महर्षींनी तो सर्व समाजाला समजाऊन सांगितला. त्यानुसार आचरण करून कित्येकांनी स्वत:चे भले करून घेतले पण पुढे युगे बदलत गेली, काळ पालटत गेला तशी समाजात अश्रद्धा, अविश्वास वाढू लागला. सध्याच्या कलियुगात तर त्याचा कहरच झाला. निरपेक्ष कर्म करून स्वत:चे भले करून घ्यायला महत्त्व न देता आज, आत्ता ताबडतोब जे हवे ते मिळवण्यासाठी सकाम अनुष्ठाने करायला लोक एका पायावर तयार होऊ लागले. साहजिकच बाप्पांच्या योगाचे महत्त्व हळूहळू कमी होत गेल्याने सध्याच्या कलियुगात तो नष्ट होताना दिसत आहे. हे असं होईल ही भविष्यवाणी बाप्पानी राजाला सांगून ठेवली होती पण एखादी गोष्ट लोप पावली म्हणजे ती टाकाऊ झाली असं थोडंच आहे. शेवटी जुनं ते सोनं असतं म्हणून पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत.
एवं पुरातनं योगं श्रुतवानसि मन्मुखात् ।
गुह्याद्गुह्यतरं वेदरहस्यं परमं शुभम् ।। 4 ।।
अर्थ- अशा प्रकारचा पुरातन योग तू श्रवण केलास. हा योग गुह्याहून अधिक गुह्य आहे, तेच वेदांचे रहस्य आहे, अत्यंत शुभ आहे.
विवरण- बाप्पांच्याकडून राजाने श्रवण केलेला योग बाप्पानी स्वत: रचलेला आहे. त्यामुळे तो सनातन आहे. मायेच्या सहाय्याने बाप्पांनी सृष्टी निर्मिती केली. सर्वांच्यासाठी कर्म ठरवून दिले. जे फळाच्या अपेक्षेने कर्म करतात ते बंधनात अडकतात व पुनर्जन्माला आमंत्रण देतात पण कोणतीही अपेक्षा न ठेवता जे कर्म करतात ते जन्ममृत्युच्या चक्रातून मोकळे होतात. असा हा परमश्रेष्ठ कर्मयोग बाप्पांच्या कृपेला जे पात्र आहेत त्यांनाच श्रवण करायला मिळतो. हे कर्मयोगाचे ज्ञान अत्यंत गुह्य असून अतिमंगल असून ते वेदातील एक रहस्य आहे. सकाम कर्म केले की, जीव बंधनात अडकतो आणि जन्ममरणाच्या चक्रात फिरत राहतो पण तेच कर्म निरपेक्षपणे केले की, तो त्या कर्माच्या बंधनात अडकून पडत नसल्याने त्याची मुक्तता होते. हेच वेदातील रहस्य आहे. जगातल्या वस्तू आपल्या आहेत असे समजून त्या मिळवण्यासाठी कर्म केले तर ते बंधनात टाकते पण वस्तूबद्दल आपलेपणा न ठेवता नि:स्वार्थ भावाने सेवा केली की, मुक्ती मिळते. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असो, श्रीमंती असो वा गरिबी असो, प्रकृती बरी असो वा नसो कोणत्याही परिस्थितीत कर्मयोगाचे पालन होऊ शकते.
आणखी एक गोष्ट लोकांच्या मनात येते की, मुक्ती वगैरे ठीक आहे पण इतर सर्व फळाच्या अपेक्षेने कर्म करत आहेत त्याचा उपभोग घेत आहेत मग मीच कर्मयोगाचं पालन का करायचं? त्याचं उत्तर असं आहे की, माणसाचं मूळ स्वरूप अविनाशी आहे मग कर्म करून मिळणारं विनाशी फळ माणसाचं कसं असू शकेल? दुसरं म्हणजे मनुष्य हा ईश्वरी अंश आहे. ईश्वर ज्याप्रमाणे परिपूर्ण आहे त्याप्रमाणे मनुष्य आहे त्या स्वरूपात परिपूर्ण असल्याने त्याला इतर कशाची गरजच नाही. तिसरे म्हणजे प्रारब्धानुसार वाट्याला आलेली कर्मे करणे हे माणसाचे कर्तव्य आहे म्हणून ते पार पाडणे आणि फळाची अपेक्षा न करता करणे हेच त्याच्यासाठी हिताचे असते. ईश्वराप्रमाणेच माणसाचे मूळ स्वरूप सूक्ष्म आणि चेतन आहे तर कर्म आणि त्याचे फळ जड आहेत. साहजिकच कर्माचा आणि त्याच्या फळाचा माणसाशी काही संबंध असणे शक्यच नाही. ह्या गोष्टी जेव्हा पटतात तेव्हा फळाची अपेक्षा करणे कसे चुकीचे आहे हे लक्षात येते. एकदा हे लक्षात आले की, हळूहळू आचरणात आणत मनुष्य आपल्या परिपूर्ण मूळ स्वरूपाकडे परत येतो.
क्रमश: