मराठा लाईट इन्फंन्ट्रीमध्ये कारगील विजय दिवस साजरा
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्यावतीने 26 वा कारगील विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इन्फंट्रीतील युद्धस्मारकावर पुष्पहार अर्पण करून 1999 च्या कारगील युद्धात बलिदान दिलेल्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. या समारंभात जवानांनी दिलेल्या बलिदानाची, त्यांच्या शूरतेची पुन्हा एकदा आठवण करून देण्यात आली.
इन्फंट्रीचे कमांडंट गिरीश उपाध्याय, सेंटर एस. एम. संदीप कोट, अग्निवीर विवेक खेडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. हे पुष्पहार रेजिमेंटच्या शौर्याच्या वारशांचे आणि सैनिकांच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरणाचे प्रतीक होते. याप्रसंगी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कौतुक करण्यात आले. कारगील संघर्षादरम्यान जवानांनी दिलेल्या सर्वोच्च योगदानामुळे रेजिमेंटचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले, असे सांगण्यात आले.
या समारंभाला रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी, जेसीओ, अग्निवीर उपस्थित होते. शहिदांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या शौर्य, देशभक्ती आणि बलिदानाने भारतीय लष्कर सदैव प्रेरणा घेत राहील, अशा वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.