कॅरेन उपांत्यपूर्व फेरीत, जोकोविचचे ‘शतक’
सिनर, स्वायटेक चौथ्या फेरीत, विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा : विद्यमान विजेती क्रेसिकोव्हाचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ लंडन
ऑलिम्पिक टेनिस चॅम्पियन सर्बिया नोव्हॅक जोकोविचने विम्बल्डन स्पर्धेत ‘शतक’ नोंदवताना शंभरावा विजय मिळविला. त्याने आपल्याच देशाच्या मिओमिर केसमानोविचचा पराभव करीत चौथी फेरी गाठली. रशियाच्या 17 व्या मानांकित कॅरेन खचानोव्हने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली
38 वर्षीय जोकोविचने केसमानोविचवर 6-3, 6-0, 6-4 अशी सहज मात करीत आगेकूच केली. त्याची पुढील लढत अकराव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरशी होणार आहे. जोकोविचने येथे 100-12 असे रेकॉर्ड नोंदवले आहे. शंभर विजय मिळविणारा तो तिसरे टेनिसपटू असून याआधी 20 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा रॉजर फेडरर व 18 वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी मार्टिना नवरातिलोव्हा यांनी हा पराक्रम केला आहे.
कॅरेन खचानोव्हने माचेराकवर 6-4, 6-2, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. चार वर्षांपूर्वीही त्याने येथे उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याची पुढील लढत टेलन फ्रिट्झ किंवा जॉर्डन थॉम्पसन यापैकी एकाशी होईल. यापूर्वीं त्याने 2022 यूएस ओपन व 2023 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. माचेराक पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या चौथ्या फेरीत खेळत होता.
अन्य सामन्यात 34 वर्षीय ग्रिगोर डिमिट्रोव्हनेही चार ग्रँडस्लॅममध्ये मिळून 100 वा विजय नोंदवला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या सेबास्टियन आफनरचे आव्हा 6-3, 6-4, 7-6 (7-0) असे संपुष्टात आणत चौथी फेरी गाठली. क्रोएशियाच्या 36 वर्षीय मारिन सिलिकनेही आगेकूच करताना स्पेनच्या जॉमे मुनारचा कडवा प्रतिकार 6-3, 3-6, 6-2, 6-4 असा मोडून काढले. त्याची पुढील लढत इटलीच्या फ्लॅव्हिओ कोबोलीशी होईल. कोबोलीने झेकच्या याकुब मेनसिकला 6-2, 6-4, 6-2 असे पराभूत केले. अग्रमानांकित जेनिक सिनरने चौथी फेरी गाठताना पेड्रो मार्टिनेझचा 6-1, 6-3, 6-1 असा धुव्वा उडविला. अमेरिकेच्या बेन शेल्टनने आगेकूच करताना हंगेरीच्या मार्टन फुक्सोविक्सचा 6-3, 7-6 (7-4), 6-2 तर डी मिनॉरने डेन्मार्कच्या ऑगस्ट होल्मग्रेनचा 6-4, 7-6 (7-5), 6-3 असा पराभव केला.
क्रेसिकोव्हाला धक्का
महिलांमध्ये विद्यमान विजेती बार्बरा क्रेसिकोव्हाचे आव्हान तिसऱ्या फेरीतच समाप्त झाले. अमेरिकेच्या दहाव्या मानांकित एम्मा नेव्हारोने तिला 2-6, 6-3, 6-4 असे हरविले तर 2022 ची चॅम्पियन इलेना रायबाकिनाला डेन्मार्कच्या क्लारा टॉसनने 7-6 (8-6), 6-3 असे पराभूत केले असल्याने सलग आठव्या वेळी महिला एकेरीत नवीन चॅम्पियन पहायला मिळणार आहे. इगा स्वायटेकला ही संधी मिळू शकते. तिने अमेरिकेच्या डॅनियली कॉलिन्सवर 6-2, 6-3 असे हरविले तर हेली बाप्टिस्ट रशियाच्या 18 वर्षीय मायरा अँड्रीव्हाकडून 6-2, 6-3 असे पराभूत झाली.
युकी भांब्री-रॉबर्ट गॅलोवे तिसऱ्या फेरीत
सोळावे मानांकन असलेल्या भारताचा युकी भांब्री व अमेरिकेचा रॉबर्ट गॅलोवे यांनी पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठताना पोर्तुगालचा नुनो बोर्जेस व अमेरिकेचा मार्कोस गिरॉन यांच्यावर 6-3, 7-6 (8-6) अशी मात केली. युकीने मिश्र दुहेरीतही आगेकूच केली असून चीनच्या जिआंग झिनयूसमवेत खेळताना त्याने पहिल्या फेरीत विजय मिळविला.