दक्षिणेत झळकणार करिना कपूर
केजीएफ स्टार यशसोबत करणार काम
करिना कपूर आतापर्यंत केवळ बॉलिवूडमध्ये काम करत आली आहे, परंतु आता ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करू इच्छिते. यादिशेने तिने आता पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. केजीएफ स्टार यशच्या चित्रपटातून ती कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे. यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटात ती दिसून येऊ शकते. यशच्या या नव्या चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास करणार आहेत. टॉक्सिक हा करिना कपूरचा यशसोबतचा पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू केले जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी एका व्हिडिओद्वारे चित्रपटाचे नाव जाहीर केले होते. याचबरोबर यशचा काउबॉय लुक सादर केला होता, यात तो खांद्यावर मशीनगन ठेवून धूम्रपान करताना दिसून आला होता. टॉक्सिक या चित्रपटासाठी करिनापूर्वी सई पल्लवी आणि राशी खन्नाच्या नावाची चर्चा होती. परंतु आता करिनाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.. परंतु अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाची कहाणी अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर आधारित असल्याचे समजते. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. करिना लवकरच रोहित शेट्टीचा चित्रपट ‘सिंघम अगेन’ आणि ‘द क्रू’मध्ये दिसून येणार आहे. यश हा दक्षिणेतील अत्यंत लोकप्रिय कलाकार असल्याने त्याचा हा चित्रपट बिगबजेट ठरणार आहे.