करावळी उत्सवाचे थाटात उद्घाटन
सात दिवस होणाऱ्या उत्सवाची 28 रोजी होणार सांगता
कारवार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारसह ज्येष्ठ मंत्र्यांनी पाठ फिरविल्याने येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावर आठ वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित आणि राष्ट्रीय पातळीवरील करावळी उत्सव 2025 चे उद्घाटन उत्साहात मासेमारी आणि बंदर खात्याचे मंत्री व जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. लाखो लोकांच्या उपस्थितीत तब्बल सात दिवस अमाप उत्साहात होणाऱ्या या उत्सवाची सांगता 28 डिसेंबर रोजी होणार आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री वैद्य म्हणाले, करावळी उत्सव हा सरकारचा किंवा शासनाचा उत्सव न होता जनतेचा उत्सव झाला पाहिजे.
करावळी उत्सवाचे आयोजन केवळ मौजमजा, मनोरंजनासाठी नव्हे तर कारवारसह जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना आणि बढावा देण्यासाठी करण्यात आले आहे. कारवार जिल्हा केवळ निसर्ग सौंदर्याच्या बाबतीतच नव्हे तर कला, संस्कृती, परंपरा आदींच्या बाबतीत अतिश्रीमंत आहे. करावळी उत्सवाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या कलेची, संस्कृतीची, खाद्य संस्कृतीची ओळख संपूर्ण जगाला करून द्यायची आहे. करावळी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेऊन उत्सवाची उंची वाढविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन मंत्री वैद्य यांनी केले. अध्यक्षस्थानी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल होते. व्यासपीठावर विधानपरिषद सदस्य गणपती उळवेकर, शांताराम सिद्धी, कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया आदी उपस्थित होते.