For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हजारो भाविकांच्या साक्षीने करंबळ-बेकवाड यात्रोत्सवाला प्रारंभ

10:54 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
हजारो भाविकांच्या साक्षीने करंबळ बेकवाड यात्रोत्सवाला प्रारंभ
Advertisement

लक्ष्मीदेवीचा विवाह थाटात : मूर्तीची पाचही गावातून मिरवणूक

Advertisement

वार्ताहर /नंदगड

करंबळ येथील लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा बुधवारी पहाटे थाटात  झाला. करंबळ पंचक्रोशीतील पाच गावांसह खानापूर शहर व विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक यात्रोत्सवात सहभागी झाले होते. सकाळी 7 वाजता देवीचा विवाह सोहळा झाला. करंबळ येथील लक्ष्मी यात्रेत करंबळ, जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल या पाच गावांचा समावेश आहे. यात्रा उत्सव कमिटीचे पदाधिकारी देवीच्या विवाह सोहळ्dयाच्या तयारीत रात्रभर जागेच होते. पाचही गावातील लोक सकाळी तीन वाजल्यापासून गटागटाने करंबळ येथील लक्ष्मी देवीच्या मंदिराकडे येत होते. आपल्याच घरातील मुलीचे लग्न आहे, अशा पद्धतीचे वातावरण होते. नवी वस्त्रs व अलंकार घालून महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. देवीला पाहण्याची सर्वांनाच आस लागली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी आनंद लुटला. शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन सर्वांना वारंवार आयोजकांकडून करण्यात येत होते. त्यानुसार स्वयंसेवक व पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.  मंगलाष्टकानंतर देवीचा विवाह सोहळा झाला.

Advertisement

देवीचे घरोघरी उत्साही स्वागत

करंबळातील लक्ष्मी मंदिरासमोर देवीचा विवाह सोहळा झाल्यानंतर देवीला मंडपाबाहेर काढले. त्यानंतर भाविकांनी देवीला हातावर घेऊन मंदिर परिसरात भव्य मिरवणूक काढली. करंबळ गावातील मानकऱ्यांच्या ओट्या स्वीकारल्या. त्यानंतर देवीचे करंबळ येथील घरोघरी उत्साही स्वागत करण्यात आले.

देवीचे माहेरघर जळगे

देवीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या जळगेकडे देवीला नेले. तेथे देवदेवतांची भेट, मानकरी व गावकऱ्यांच्या ओट्या स्वीकारल्या. माहेरच्या मंडळींना भेट दिल्यानंतर देवी पुन्हा करंबळ पंचमाई मंदिराकडे आल्यानंतर रुमेवाडीकडे प्रयाण झाले. रुमेवाडीतही देवीची मिरवणूक काढली.

देवीचे सासर होनकल

देवीचे सासर समजल्या जाणाऱ्या होनकल या गावी दुपारी देवीला नेले. तेथे मिरवणूक काढून ओट्या स्वीकारल्या. कौंदल तेथे सायंकाळी वेळ मिरवणूक काढली. ओट्या स्वीकारणे, देवदेवतांची भेट असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री 9 वाजता करंबळ येथील गदगेवर देवीला विराजमान केले. नऊ दिवस गदगेच्या ठिकाणी यात्रा उत्सव होणार आहे.

बेकवाड लक्ष्मी देवींचा विवाह सोहळा थाटात

एक सिंहासनारुढ, दुसरी वाघावर आरुढ : आठवडाभर कार्यक्रम

बेकवाड येथे श्री लक्ष्मीदेवीच्या दोन लाकडी मूर्ती आहेत. त्यापैकी एक सिंहासनारुढ तर दुसरी वाघावर आरुढ झाली आहे. बुधवारी पहाटे एकाचवेळी दोन्ही देवींचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. विवाह सोहळ्dयाने लक्ष्मीदेवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी सुमारे पंचवीस हजारहून अधिक भाविक उपस्थित होते. बेकवाड गावची लक्ष्मी देवीची यात्रा तब्बल 18 वर्षानंतर होत आहे. त्यानिमित गेल्या वर्षभरापासून घरांची डागडुजी तर काही ठिकाणी नवीन घरे बांधण्यात आली आहेत. आवश्यक ठिकाणी रस्ते, गटारी बांधण्यात आल्या आहेत. गावात स्वच्छता व सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. देवीची यात्रा भरविण्यात येणार असल्याने ग्रामस्थ सज्ज झाले होते. लक्ष्मीदेवी यात्रा कमिटीने यात्रेपूर्वीचे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडले होते. नियोजित वेळेनुसार बुधवारी पहाटे सात वाजता लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा झाला.

त्यानंतर खऱ्या अर्थाने लक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. बुधवारी पहाटे तीन वाजल्यापासून विवाह सोहळ्याची तयारी चालू होती. पहाटे चार वाजल्यापासूनच बेकवाड, नंदगड, बिडी, हलशी, इटगी व तालुक्याच्या विविध भागातून भाविक देवीच्या विवाह सोहळ्dयासाठी दाखल होत होते. माहेरवाशिनी, पै. पाहुणे दोन दिवस पूर्वीच दाखल झाले आहेत. लक्ष्मी देवीच्या विवाह सोहळ्dयासाठी महिला नवीन वस्त्रs व दागिने घालून उपस्थित होत्या. युवकांनी भगव्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. वडीलधारी मंडळी डोक्यावर फेटे व टोप्या घालून उपस्थित होती. नियोजित वेळेनुसार देवीचा विवाह सोहळा झाला. यावेळी सर्वांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत होते.  विवाह सोहळ्dयानंतर लक्ष्मी देवीच्या मंदिरासभोवती दोन्ही लक्ष्मी देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. देवीची गावातील अन्य देवतांना भेट झाल्यानंतर मानकऱ्यांच्या ओट्या स्वीकारण्यात आल्या. विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी 9 वाजता गावच्या पूर्वेला असलेल्या गदगेवर देवीला विराजमान करण्यात आली. या ठिकाणी आता आठवडाभर यात्रोत्सव सुरू राहणार आहे.

Advertisement
Tags :

.