Karad Krishna Ghat | कराडचा कृष्णा घाट गर्दीने फुलला; अस्ताव्यस्त पार्किंगमुळे पर्यटकांची मोठी कसरत
प्रीतिसंगमावर सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा विळखा;
कराड : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने कराडच्या कृष्णा घाटावर सायंकाळच्यावेळी लहानग्यांसह नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दी वाढत असताना घाटावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉ लसमोर दुचाकींचे अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने महिला व लहानग्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तर कृष्णा घाट गर्दीने फुलला असताना दुचाकी व चारचाकी वाहने गर्दीत घुसवली जात असल्याने नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.
कृष्णा-कोयना प्रीतिसंगमाच्या काठावर असलेल्या प्रीतिसंगम बागेत दररोज शहरासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. यात महिला व लहानग्यांची संख्या जास्त असते. सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
संध्याकाळी गर्दीच्यावेळी कृष्णा घाटावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉ लसमोर अस्ताव्यस्त दुचाकीलावल्या जात असल्याने महिला व नागरिकांना येथून चालताही येत नाही. बागेच्या मुख्य प्रवेशव्दारावरही अशीच स्थिती आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने संध्याकाळच्यावेळी कृष्णा घाट गर्दीने फुलून जात आहे. घाटावर गर्दी असताना दुचाकी व चार चाकी वाहने बिनधास्तपणे गर्दीत घुसवली जात आहेत. त्यामुळे महिला, नागरीक व लहानग्यांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक पोलीस असतानाही कोंडी
संध्याकाळी गर्दीच्यावेळी कृष्णा घाटावर एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येत आहे. मात्र पोलीस चौकीपासून प्रीतिसंगम बागेच्या प्रवेशव्दारापर्यंत नागरीकांची प्रचंड गर्दी असते, त्यातच दुचाकी व चारचाकी वाहने घुसवल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याची वाहतूक कोंडी सोडवताना दमछाक होत आहे. त्यामुळे येथे किमान दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.