Satara | कराडला निधीची कमतरता भासू देणार नाही : पालकमंत्री शंभूराज देसाई
कराड विकासासाठी पालकमंत्री देसाईंचा सक्रिय पाठिंबा
कराड : पालकमंत्री म्हणून काम करताना कराड शहरासाठी भरपूर निधी दिला आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे यापुढेही कराडला निधीची कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्टच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक अल्ताफभाई शिकलगार, विजयसिंह यादव, अखतर आंबेकरी, नगरसेविका मिनाज पटवेकर, रजिया आंबेकरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, हाजी मजहरभाई कागदी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, बशीरभाई खोंदू लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष हाजी जैनुद्दीन भादी, सचिव इसाक सवार, हाजी मुनीर बागवान, हाजी बरकत पटवेकर, मज्जीद आंबेकर, साबिरमियाँ मुल्ला, खैय्याम मुल्ला व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले की, चार वर्षे नगरपालिकेबर प्रशासक असताना पालकमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली प्रशासनाने काम केले आहे. मी पालकमंत्री असल्यामुळे राजेंद्रसिंह यादव यांना भरपूर फायदा झाला. ज्यावेळी सत्ता नव्हती त्यावेळी राजेंद्रसिंह यादव यांनी माझ्याकडून भरपूर निधी घेऊन कराडमध्ये विकासकामे केलेले आहेत. कराडमधील विकास कामाबाबत पुढील आठवड्यात नगरपालिकेत बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये शहराच्या पुढील पाच वर्षाचा रोड मॅप तयार करणार आहे.
जयंतकाका पाटील म्हणाले, आपल्याला नगर पालिकेत जे यश मिळाले त्यामध्ये मुस्लिम समाजाचा खूप मोलाचा वाटा आहे.राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराडमधील शाश्वत विकास आणि विचार घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो. आणि या जनतेने आम्हाला स्वीकारले. नगरपालिका निवडणुकीत मुस्लिम समाजाने सिंहाचा वाटा उचललेला आहे. कराड शहरातील मुस्लिम समाजासाठी आम्हाला चांगले काही शाश्वत असे भरीव असे काम करायचे आहे. ते काम समाजातील लोकांनी सुचवावे ते आम्ही नक्की करून दाखवू, कराड नगर पालिकेचे व्यासपीठ हे सर्व सामन्याचे हक्काचे व्यासपीठ आहे, असे ते म्हणाले.