Karad News | कराडमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान राडा; मारहाणीत दोघे जखमी
कराड : मलकापूर येथील एकाशाळेसमोर शाळकरी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान दगडफेक आणि मारहाणीत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांनी सुरुवातीला अपघात झाल्याचे सांगितले होते; मात्र नंतर पालकांना खरी घटना सांगितल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. संबंधित एक विद्यार्थी आपल्या मित्राला घेण्यासाठी मलकापूर येथील शाळेजवळ गेला असता तेथे दोन गटांमध्ये शाब्दिक बाद झाला. बाद वाढत गेल्याने काही विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. या घटनेत दोन विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच अन्य एका विद्यार्थ्यालाही मारहाण झाली आहे.
रुग्णालयात नेताना विद्यार्थ्यांनी भीतीपोटी किंवा प्रकरण अधिक वाढू नये या उद्देशाने आपण दुचाकीवरून पडल्याचे डॉ क्टरांना सांगितल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र घरी परतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांना घडलेला प्रकार सांगितला.