स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कराड देशात पुन्हा अव्वल
कराड :
स्वच्छतेत झालेली पिछाडी भरून काढत कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2024 सालच्या स्पर्धेत पुन्हा एकदा देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. गुरूवारी 17 जुलै रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत कराड पालिकेस राज्य शासनाकडून कळविण्यात आले आहे. कराड पालिकेच्या यशाने कराडकर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील अव्वल पालिकांना उपस्थित राहण्यासाठी राज्य शासनास निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनाने कराड पालिकेस कळवले आहे. या समारंभात पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत कराड पालिकेस राज्य शासनाकडून कळविण्यात आले आहे. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी संदीप रणदिवे, मुकेश अहिवळे, आशिष रोकडे, आशिष रोकडे, फैय्याज बारगिर, शेखर लाड, किरण कांबळे, अशोक डाईंगडे, संजय चावरे व मुकादम हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंगळवारी 15 रोजी दिल्लीला रवाना होणार आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व मध्यप्रदेश या पाच राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यातील 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकांमध्ये 2019 व 2020 कराड पालिकेने प्रथम क्रमांक मिळवला. 2021 साली सहावा तर 2022 मध्ये देशात तिसरा क्रमांक पटकावला होता. 2023 मध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. 2019 मध्ये तत्कालिन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कालावधीत पालिकेने देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तत्कालिन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही स्वच्छतेत सातत्य राखल्याने कराड पालिका अव्वल स्थानावर पोहोचली.
- पहिल्या तीन क्रमांकात निश्चित, पाचगणी पालिकाचाही होणार सन्मान
राज्य शासनाकडून कळवण्यात आलेल्या यादीनुसार राष्ट्रपतींच्या हस्ते मीरा-भाईंदर महापालिका व कराड नगरपालिकेचा सत्कार होणार आहे. त्यामुळे देशाच्या पश्चिम विभागात कराड पहिल्या तीन क्रमांकामध्ये निश्चित आहे. याशिवाय सुपर स्वच्छ लीगमध्ये नवी मुंबई, लोणावळा, विटा, सासवड, देवळाली प्रवरा, पाचगणी व पन्हाळा या पालिकांचाही सन्मान होणार आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेचाही सन्मान होणार आहे.