कराड पोलिसांनी तिघांकडून केले दहा ग्रॅम ड्रग्ज जप्त
कराड :
ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन अटक केले. त्यांच्याकडून सुमारे दहा ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली. राहुल अरुण बडे (वय ३७, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सोमवार पेठ, कराड), समीर उर्फ सॅम जावेद शेख (वय २४, रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका, कराड), तौसीब चाँदसो बारगिर (वय २७, रा. अष्टविनायक मंगल कार्यालयानजीक, कार्वेनाका, कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथील टेंभू रोडवर फेब्रुवारी रोजी रात्री एकजण ड्रग्ज 99 विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी उपअधीक्षक कार्यालयातील सहाय्यक निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक फौजदार सपाटे यांच्यासह पथकाला सूचना दिल्या. पोलीस पथक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हजारमाची गावच्या हद्दीत ओगलेवाडी रेल्वे स्टेशननजीक रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी मध्यरात्री तिघेजण ओगलेवाडी रेल्वे स्थानकाकडून कराडकडे चालत येताना त्यांना दिसले. हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलीस पथकाने त्या तिघांनाही सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता राहुल बड़े, समीर उर्फ सॅम शेख या दोघांकडे प्लास्टिकच्या पिशवीत स्फटिकासारखे कण असलेली पावडर आढळून आली. तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयितांकडे याबाबत कसून तपास केला जात असून तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत