For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भंगार गाड्यांच्या जिवावर चाललाय कराडचा डेपो

05:28 PM Mar 02, 2025 IST | Radhika Patil
भंगार गाड्यांच्या जिवावर चाललाय कराडचा डेपो
Advertisement

कराड / सतीश चव्हाण : 

Advertisement

 २०१६-१७ साली तब्बल ११० एसटी बसच्या माध्यमातून प्रवाशांची सेवा करणाऱ्या कराड आगाराकडे सध्या केवळ ७८ बस उपलब्ध आहेत. त्यातही बहुतांश बसचे १२ लाख किलोमीटर अंतर पूर्ण होत आल्याने या बस भंगारात काढाव्या लागणार आहेत. कराड आगार अक्षरशः अशा भंगार बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करीत आहे. प्रवासी घेऊन जाणाऱ्या कराड आगाराच्या बस वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोकण व घाटमाथ्याला जोडणारे पुणे-कोल्हापूर मार्गावरील कराड हे मध्यवर्ती बसस्थानक आहे. दोन विधानसभा मतदारसंघाचा कराड हा मोठा तालुका आहे. कराड हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने कराडसह आसपासच्या तालुक्यातून दररोज हजारो विद्यार्थी कराडला शिक्षणासाठी येत असतात. कराड तालुक्याचा विस्तार व लोकसंख्या पाहता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. कराड आगाराच्या बसमधून दररोज जवळपास २५ ते ३० हजार प्रवासी प्रवास करतात. वास्तविक कराड आगाराकडे आवश्यकतेपक्षा जवळपास निम्म्याच बस उपलब्ध आहेत. त्यामुळे लांब पल्ल्यासह तालुक्यातील अनेक फेऱ्या बसअभावी बंद केल्या आहेत. हे आगार पूर्ण क्षमतेने चालल्यास दररोज किमान ४० ते ५० हजार प्रवासी बसने प्रवास करतील.

Advertisement

२०१६-१७ साली कराड आगाराकडे ११० बसेस उपलब्ध होत्या. तर २०१९ साली ९९ बस उपलब्ध होत्या. कराडला नवीन प्रशस्त बसस्थानक झाले, बस मात्र मिळाल्या नाहीत. सध्या कराड आगाराकडे केवळ ७८ बस उपलब्ध आहेत. त्यातील पाच बस चालू महिन्यात भंगारात काढाव्या लागणार आहेत. तर येत्या पाच ते सहा महिन्यांत आणखी १७बस भंगारात काढाव्या लागणार आहेत. २०२३ साली कराडला पाच नवीन बस मिळाल्या. या बस सोडल्या तर उर्वरित सर्वच बस जुन्या व मुदत संपत आलेल्या आहेत. बस सुस्थितीत नसल्याने कराड आगाराने लांब पल्ल्याच्या बहुतांश फेऱ्या बंद केल्या आहेत. आहेत त्या मोडक्या तोडक्या बसच्या माध्यमातून कराड आगार तालुक्यात सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातही पुरेशा बस उपलब्ध नसल्याने कराड तालुक्यातील अनेक फेऱ्या बंद करण्याची वेळ आगारावर आली आहे.

  • प्रवाशांच्या सुरक्षेचे काय?

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हटले जाते. एसटीच्या बाबतील एखादी घटना घडल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येतो. कराड आगाराच्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी मात्र रोजच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. बसची संख्या तोकडी असल्याने असलेल्या बसमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट, तिप्पट प्रवासी घ्यावे लागत आहेत. अनेक बसचे पत्रे फाटलेले आहेत. वारंवार बस रस्त्यात बंद पडत आहेत. कराड आगाराच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांच्या जिवाची रोज हेळसांड होत असताना लोकप्रतिनिधी व एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मात्र दुर्लक्ष करत आहेत

  • सवलती दिल्या... बस कोण देणार?

राज्य शासनाने मोठा गाजवाजा करीत एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट, ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास अशा अनेक सवलती दिल्या. पण बसच नसल्याने महिला व ज्येष्ठांना दररोज पायपीट करावी लागत आहे.. कराडसह आसपासच्या तालुक्यातून दररोज हजारो विद्यार्थी विद्यानगर येथे शिक्षणासाठी येत असतात. ग्रामीण भागातून कराड बसस्थानकात आल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यानगरला जायला व यायला बस मिळत नाही. त्यामुळे अर्ध्या तिकिटाची सवलत असतानाही विद्यार्थिनींना दररोज चार ते पाच किलोमीटरची पायपीट करीत महाविद्यालयात ये-जा करावी लागत आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या गोरगरीब शेतकरी व मजुरांच्या मुलांना दररोज रिक्षाला ४० रुपये देणे शक्य नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाने पुरेशा बस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.