For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कराडजवळ भीषण अपघात; महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू

01:18 PM Oct 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
कराडजवळ भीषण अपघात  महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू
Advertisement
सातारा : कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या सात तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीला कराडजवळ भीषण अपघात झाला. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर स्कॉर्पिओने ट्रकला मागून धडक दिल्याने चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे.

दर्शनाहून परतताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, कातरखटाव येथील सात तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते स्कॉर्पिओ गाडीतून गावाकडे परतत असताना कराड शहराजवळील महामार्गावरील उड्डाणपुलावर त्यांच्या वाहनाची ट्रकला जोरदार धडक बसली.

Advertisement

धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात चालक तेजस देशमुख (२५), सागर निंबाळकर (२३), सुयश चिंचकर (२०) आणि रोहित धोत्रे (२१) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तिघांवर रुग्णालयात उपचार

या अपघातात ऋतुराज दुबळे (२१), शंतनू शिंगाडे (२०) आणि अमन तांबोळी (२३) हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू

अपघातातील सर्व तरुण कातरखटाव गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. एकाच गावातील चार तरुणांचा एकाच दुर्घटनेत मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून पुढील तपास

अपघाताची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मदत केली.

पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कराड पोलिसांकडून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Advertisement

.