Kapa Waterfall Radhangari: राधानगरीजवळचा हिडन स्पॉट, 'कापा' धबधबा तुम्ही पाहिलाय?
सध्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.
By : महेश तिरावडे
राधानगरी : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीपासून अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या बनाचीवाडी येथील 'कापा' धबधबा पुन्हा प्रवाहित झाला आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला हा धबधबा नव्याने वाहू लागल्याने निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक नवीन ठिकाण उपलब्ध झाले आहे. सध्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. सातत्याने पाऊस सुरु असल्याने वातावरण हिरवेगार झाले आहे. परिसरातील लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले असून पर्यटकांची गर्दी होत आहे.
डोंगराळ भागातून आणि शेतवडीतून पायवाटा तुडवत पर्यटक या धबधब्याकडे आकर्षित होत आहेत. अजूनही फार कमी पर्यटकांना या धबधब्याबद्दल माहिती असल्याने निसर्गाचा शांत आणि अनुभव घेता येत आहे. हिरवीगार झाडी फेसळणारे आणि डोंगरांमधून कोसळणारे पाणी हे दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे.
राधानगरी परिसरातील निसर्गरम्य स्थळांमध्ये आता 'कापा' धबधब्याची भर पडली असून, आगामी काळात हे ठिकाण पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांसाठी काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटनवाढीला चालना मिळेल. परंतु त्यासोबत इथील हुल्लडबाजी रोखण्याचेही आव्हान असणार आहे.