For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कानडी कार्यक्रमांसाठी कन्नडिगांचा मनपा आयुक्तांवर दबाव

10:47 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
कानडी कार्यक्रमांसाठी कन्नडिगांचा मनपा आयुक्तांवर दबाव
Advertisement

50 लाखांचे अनुदान खर्च करण्याची मागणी : शुक्रवारी घेतली आयुक्तांची भेट, ‘अन्नोत्सव‘च्या मराठी-इंग्रजी भाषेतील फलकांवरही वक्रदृष्टी

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 50 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे सदर अनुदान कन्नड सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खर्च करण्यात यावे, या मागणीसाठी बेळगावातील विविध कन्नड संघटनांनी शुक्रवारी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांची भेट घेऊन दबाव घालण्याचा प्रयत्न केला. तसेच रोटरी क्लबतर्फे आयोजित केलेल्या अन्नोत्सवाचे फलक मराठी व इंग्रजी भाषेत लावण्यात आले असल्याचे सांगत संबंधितांना समज देण्याची मागणीही केली.

बेळगावसह परिसरात मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या 70 वर्षांपासून सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावा यासाठी लढा सुरू आहे. 2004 मध्ये सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सीमाभागावर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून खटाटोप सुरू आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती संपविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रशासनाच्या सहकार्याने विविध कन्नड संघटनांचे मूठभर कार्यकर्ते सातत्याने आगळीक करताना दिसत आहेत. सरकारच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढत मराठी भाषेतील फलक हटविण्यासह महापालिकेकडून अन्य भाषेतील अक्षरांवर काळे फासण्यापर्यंत महापालिकेची मजल गेली तर कायदा हातात घेत कन्नडिगांनी हैदोस घातला आहे. पण त्यांच्यावर प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही.

Advertisement

गेल्या 70 वर्षांपासून बेळगावात मराठी भाषिकांच्यावतीने 1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनाचे आयोजन केले जाते. त्यादिवशी शहरातील प्रमुख मार्गावरून मूकसायकल फेरीचे आयोजन करत सभा घेतली जाते. मात्र कर्नाटक राज्योत्सव दिनादिवशी 1 नोव्हेंबर काळादिन पाळण्यास बंदी घालावी, अशी जनहित याचिका धारवाड उच्च न्यायालयात दाखल केली होती. पण काळ्यादिनाला परवानगी द्यावी की न द्यावी याचा सर्वस्वी अधिकार स्थानिक प्रशासनाला आहे, असा निर्वाळा देत जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे बेळगावात कन्नडिगांचे वर्चस्व दाखविण्यासाठी वळवळ करणाऱ्या कन्नडिगांनी राज्योत्सव दिनाला सरकारने अनुदान मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने 50 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. सदर अनुदानावर कन्नड संघटनांची दृष्टी पडली असून सदर अनुदान कन्नड सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खर्च करावे, यासाठी मनपा आयुक्तांवर दबावतंत्र आणण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघात टप्प्याटप्प्याने तीन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करावेत, अशी मागणी केली जात आहे. शुक्रवारी मनपा आयुक्तांच्या कक्षात कन्नड संघटनांनी ही मागणी केली.

प्रशासन कोणती भूमिका घेणार

पहिला कार्यक्रम 19 जानेवारीला घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आल्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. तर उर्वरित दोन कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यापर्यंत आयोजित करण्याचा डाव आखला आहे. 1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या कार्यक्रमावेळी शहरात डीजेच्या तालावर हिडीस नृत्य करून अक्षरश: बेळगावकरांना वेठीस धरण्यात आले. कांठळ्या बसणाऱ्या आवाजाने वृद्ध, रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागला. इतकेच नव्हेतर चाकूहल्ल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

यानंतर आता 50 लाखाच्या निधीतून पुन्हा तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्याची मागणी विविध कन्नड संघटनांकडून केली जात असल्याने प्रशासन आता कोणती भूमिका घेणार, हे पाहावे लागणार आहे. भेटीवेळी शहरातील पुन्हा फलकांचा प्रश्न उकरून काढण्यात आला. कन्नड व्यतिरिक्त अन्य भाषेत लावण्यात आलेले फलक काढण्यासाठी मनपाने पुढाकार घ्यावा, असा अनाहुत सल्लाही देण्यात आला. रोटरी क्लबतर्फे अन्नोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यांच्याकडून इंग्रजी व मराठी भाषेत फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना समज द्यावी, अशी हास्यास्पद मागणी करण्यात आली.

Advertisement
Tags :

.