कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडांनी एसटीला आणि कर्मचाऱ्याला फासलं काळ
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळण्याची शक्यता
कोल्हापूर
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्र सीमेच्या लगत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांवर कन्नड भाषेची सक्ती आणि कन्नड रक्षक वेदिका या कानडी संघटनेकडून मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार यामुळे मराठी भाषिक त्रस्त आहे. अशातच काल रात्री कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट करत कर्नाटक हद्दीतील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे एसटीला आणि एसटी कर्मचाऱ्याला कन्नड येतं का विचारत काळ फासल आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि भाषावाद यामध्ये कोणतीही घटना घडली की पहिलं टार्गेट एसटी महामंडळाच्या गाड्या होतात. काल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बेंगलोर मुंबई एस टी क्रमांक MH14 KQ 7714 ही एसटी चालक भास्कर जाधव चित्रदुर्ग येथून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. यावेळी रात्री साडेनऊच्या सुमारास कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अचानक एसटी अडवली. चालकास कन्नड येत का अशी विचारणा केली. कन्नड येत नसल्याचे सांगितल्यानंतर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चालकास एसटीतून खाली उतरवलं आणि तोंडाला काळ फासत कन्नड येत नसेल तर कर्नाटकात येऊ देणार नाही अशी जोरदार घोषणाबाजी करू लागले. शिवाय एसटीला देखील काळ फासल याची माहिती मिळताच महाराष्ट्रातून एसटी अधिकारी चित्रदुर्गच्या दिशेने रवाना झाले असून आज एसटी महाराष्ट्रात आणली जात आहे. मात्र या घटनेमुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून आम्हाला सुरक्षा मिळाली नाही तर आम्ही कर्नाटकात गाड्या घेऊन जाणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. शिवाय या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील उमटण्याची शक्यता आहे.
आंतरराज्य वाहतूक सुरू असताना दोन्ही राज्यामध्ये समन्वय असायला पाहिजे. महाराष्ट्र कर्नाटक वाहतूक करणारे प्रवाशांची संख्या मोठी आहे. चालक आणि वाहक यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी महामंडळ घेत असेल तर आम्ही जायला आमची अडचण नाही. मात्र चालक आणि वाहक यांना कोणतीही सुरक्षा दिली जात नाही. दोन्ही राज्यातील संघटनात्मक आणि राजकीय वादामध्ये एसटी चालकांना आणि सर्वसामान्य घटकांना ओढल जात आहे. दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने एकत्र बसून सुरक्षिते संदर्भात निर्णय घ्यावा जोपर्यंत आम्हाला सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत कर्नाटकमधील वाहतूक थांबवण्यात यावी अशी मागणी कर्मचारी करू लागले आहेत...
कर्नाटक सरकारने वेळीच आवर नाही घातला तर आम्ही शिवसेना (उबाठा) च्या वतीने संपूर्ण पिक्चर दाखवू
कर्नाटक सरकारने या लोकांवर ताबडतोब गुन्हे दाखल करावेत. यासोबत महाराष्ट्र राज्य सरकारनेही ही घटने गांभीर्याने घ्यावी. एका मराठी माणसाला कन्नड बोलण्यासाठी सक्ती केली, त्याला मारहाण केली हा कोणता न्याय आहे. कर्नाटक सरकारने वेळीच याला आवर घालावा. नाहीतर हा ट्रेलर आहे. तर संपूर्ण पिक्चर शिवसेना (उबाठा) च्या वतीने दाखविण्यात येईल. महाराष्ट्रात एकही कर्नाटकची गाडी येऊ देणार नाही. ना कन्नड बोलू देणार अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली.
संजय पवार, उपनेते, शिवसेना उबाठा