कन्नड संघटनांचा म.ए. समितीविरोधात थयथयाट
पोलिसांनी वाटेतच रोखून पाठविले माघारी : मराठी विरोधात ओकली गरळ
बेळगाव : कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना झालेली गर्दी पाहून कन्नड संघटनांचा थयथयाट सुरू झाला. परंतु पोलीस प्रशासनाने कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना वेळीच रोखून पुन्हा माघारी पाठविले. यामुळे कन्नड संघटनांना कोणतीही स्टंटबाजी करता आली नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नड सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. गल्लोगल्ली नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून धसका घेतलेल्या कन्नड संघटनांनी समितीच्या महामोर्चाला परवानगी देऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मोर्चाला परवानगी दिल्यास आम्हीदेखील मोर्चा काढू, असे माध्यमांना सांगण्यात आले. धास्तावलेल्या कन्नड संघटनांकडून जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांना निवेदनही दिले होते.
कन्नड संघटनांचे निवेदन स्वीकारुन धाडले माघारी
सोमवारी सकाळी काही कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्याचा प्रयत्न केला. त्यांना सिव्हील हॉस्पिटलनजीक पोलिसांनी रोखून माघारी पाठविले. तसेच जुन्या पोलीस आयुक्त कार्यालयापासून काही संघटना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्यास निघाल्या. त्यांनाही आरटीओ सर्कल येथे थांबविण्यात आले. म. ए. समितीला परवानगी नाकारली असल्याने आपणही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येऊ नये, अशी सूचना करण्यात आली. प्रांताधिकारी श्रवण नायक यांनी कन्नड संघटनांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर सगळ्यांना माघारी पाठविण्यात आले.
संघटनांमधील स्पर्धेमुळे स्टंटबाजी वाढली
मराठी विरोधी गरळ ओकणाऱ्या मोजक्या तीन ते चार कन्नड संघटना बेळगावमध्ये आहेत. या संघटनांमध्ये कोण मराठीच्या विरोधात अधिक गरळ ओकतो, याबाबत स्पर्धा असते. त्यामुळे एका संघटनेने पत्रकार परिषद घेतली तर दुसरी संघटना मोर्चा काढून मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकत असते. त्यामुळे मागील काही दिवसांत स्टंटबाजी वाढल्याचे दिसून येत आहे.