कन्नड संघटनांचा चन्नम्मा चौकात पुन्हा धिंगाणा
वाहतूक व्यवस्था कोलमडली : कोंडीमुळे बेळगावकरांतून संताप, पोलिसांची केवळ बघ्याची भूमिका
बेळगाव : कानडी संघटनांनी सोमवारी पुन्हा एकदा बेळगावला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. चन्नम्मा चौकात म्होरक्या वाटाळ नागराजच्या उपस्थितीत मूठभर कन्नड कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. पोलिसांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यातच वाहतूक मार्गात बदल करून पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. उन्हाच्या झळा असह्या झाल्या असतानाच वाहनचालकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. गेल्या पंधरा दिवसांपासून कानडी संघटनांकडून बेळगावात धिंगाणा घालण्याचे काम सुरू झाले आहे. म. ए. समितीवर कारवाई करण्याची वल्गना करत पंधरा दिवसांपूर्वी रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा बेळगावला आला होता. समिती नेत्यांना तडीपार करण्यात यावे, अशी हास्यास्पद मागणी त्याने केली होती. त्यावेळीदेखील जवळपास अडीच तास चन्नम्मा चौकात हायड्रामा केला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चन्नम्मा चौकाकडे येणारी वाहने अन्यत्र मार्गावरून वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता.
त्यानंतर सोमवारी पुन्हा कन्नड संघटनांनी चन्नम्मा चौकात आंदोलन करून धुडगूस घातला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळपासूनच चन्नम्मा चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दुपारनंतर कन्नडिगांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच तासभर आधी वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली. त्यामुळे विविध मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, या आंदोलनाचा फटका रुग्णवाहिकेलाही बसला. रुग्णवाहिकेला लांबचा पल्ला गाठून जिल्हा रुग्णालयाकडे यावे लागले. सातत्याने चन्नम्मा चौकात आंदोलने होत असल्याने कन्नड संघटनांवर आवर घालावा, अशी मागणी केली जात आहे. समितीच्या विरोधात गरळ ओकत 22 मार्चला कर्नाटक बंद करणार असल्याची वल्गना करण्यात आली. सातत्याने बेळगावकरांना कन्नड संघटनांनी वेठीस धरण्याचा प्रकार सुरू ठेवल्याने बेळगावकरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.