मूठभर कन्नड कार्यकर्त्यांचा मनपासमोर पुन्हा धिंगाणा
मराठी उल्लेख केल्याने पोटशूळ, मराठीबरोबरच कन्नड फलक फाडून गेंधळ
बेळगाव : केवळ मराठीबाबत द्वेष निर्माण करून गोंधळ घालण्याचा प्रकार मूठभर कन्नड कार्यकर्ते करत असतात. गुरुवारी महानगरपालिकेसमोर आंदोलन करून यापुढे कन्नडमध्येच फलक लावावेत, अशी मागणी केली. त्याठिकाणी महानगरपालिकेच्या गणेशोत्सव मंडळाबाबत लावण्यात आलेल्या फलकावर कन्नडबरोबरच मराठीचा उल्लेख होता. तो फलक काढण्यास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव घालण्यात आला. मात्र मराठीबरोबर कन्नड असलेला फलक फाडून कन्नड भाषेचाही स्वत:च अवमान केल्याचा प्रकार घडला आहे.
कन्नड भाषेबद्दल या कार्यकर्त्यांना कोणतीच अस्मिता किंवा स्वाभिमान नसल्याचे दिसून आले. केवळ मराठीला विरोध करायचा हाच या मागचा उद्देश होता. मात्र यामध्ये कन्नड भाषेचा अवमान कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे इतर कन्नड कार्यकर्ते कोणती भूमिका घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षीही गणेशोत्सव साजरा करताना विविध ठिकाणी फलक लावण्यात आले. येथे मराठी भाषिक अधिक प्रमाणात असल्यामुळे आजपर्यंत मराठीतच हे फलक लावण्यात आले होते. मात्र त्याची पोटतिडीक मूठभर कन्नड कार्यकर्त्यांना निर्माण झाली.
फलक फाडल्यामुळे संताप
त्यामुळे गुरुवारी महानगरपालिकेसमोर काहीवेळ गोंधळ घालून वातावरण बिघडविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे अथणी, बैलहोंगल, रायबाग, कुडची, सौंदत्ती परिसरातून कार्यकर्ते आले होते. स्थानिक कार्यकर्ते कोणीच नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांतूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गणेशोत्सवाचा फलक फाडल्यामुळे संतापही व्यक्त करण्यात आला.