दुकानांवरील फलकांवरून भाग्यनगरात कन्नड कार्यकर्त्यांची दमदाटी
बघून घेण्याची’ धमकी : व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
प्रतिनिधी/ बेळगाव
कोणत्याही प्रश्नाचे राजकारण कसे केले जाते, याचे प्रत्यंतर शुक्रवार भाग्यनगरवासियांना आले. याबाबतचे वृत्त असे की कर्नाटक राज्योत्सव दिनादिवशी मराठी भागातील व्यापाऱ्यांना फलकावरून दमदाटी करण्याचा कन्नड संघटनांकडून प्रयत्न झाला. राज्योत्सव मिरवणूक सुरू होण्यापूर्वी फलक बदला, अन्यथा आमच्या पद्धतीने फलक काढू, अशी धमकी मराठी भाषिक व्यापाऱ्यांना देण्यात आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी व शुक्रवारी भाग्यनगर परिसरात कानडी संघटनांचे काही मुजोर कार्यकर्ते फिरत होते. दुकानांवर इंग्रजी अथवा मराठी फलक दिसताच त्या व्यापाऱ्याला धमकावण्यात येत होते. वास्तविक फलक बदलण्याची जबाबदारी महानगरपालिकेकडे आहे. महानगरपालिकेकडून व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन फलकांवर 60 टक्के कन्नड व उर्वरित इतर भाषा लिहिण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. परंतु, केवळ बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी कानडी संघटनांचा प्रयत्न सुरू आहे.
भाग्यनगर येथे व्यापाऱ्यांना फलकांवरून धमकावण्यात आले. इंग्रजी भाषेत लिहिण्यात आलेले फलक अजून का बदलले नाहीत? अशी अरेरावी करत आमच्या पद्धतीने फलक काढला जाईल, अशी धमकीही देण्यात आली. या घडलेल्या प्रकारामुळे मराठी व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. व्यवसाय करणेही आता अवघड झाल्याने या कानडी संघटनांच्या मुजोर कार्यकर्त्यांना अडविणे गरजेचे आहे.