For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकुंबी शिमगोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

10:12 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
कणकुंबी शिमगोत्सवाला उद्यापासून प्रारंभ
Advertisement

आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : 31 रोजी तुलाभार कार्यक्रमाने उत्सवाची सांगता

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिशय महत्त्वाच्या धार्मिक आणि पारंपरिक अशा शिमगोत्सवाला कणकुंबी आणि परिसरातील गावांमध्ये उद्या रविवारपासून सुरुवात होणार असून त्यानिमित्ताने सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कणकुंबी भागातील चिगुळे, पारवाड, चिखले, बेटणे, चोर्ला, माण, हुळंद, तळावडे आदी गावांमध्ये शिमगोत्सव अतिशय पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. विशेषत: कणकुंबीच्या शिमगोत्सवाला एक वेगळेच महत्त्व आहे.कणकुंबीच्या शिमगोत्सवाला उद्यापासून आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 24 मार्च रोजी 12 वाजता मंदिराकडे होळीचे गाऱ्हाणे झाल्यानंतर संध्याकाळी होळीसाठी सर्व ग्रामस्थ जंगलामध्ये प्रस्थान करतात. रात्री 8 वाजता माउली देवीच्या पालखीचे मंदिरापासून ते चव्हाटा मंदिरापर्यंत वाजतगाजत आगमन व स्थानापन्न. सोमवार दि. 25 रोजी सकाळी जंगलातून होळीचे गावच्या वेशीतून चव्हाटा मंदिराकडे मिरवणुकीने आगमन. 12 वाजता होळीचे गाऱ्हाणे व होळी उभारणे. त्यानंतर वेशीतील होळी उभारणे आणि दुपारी बाजार गल्लीमधील होळी पेटवणे व संध्याकाळी सहा ते आठपर्यंत बाजार गल्ली भजनी मंडळाचे बाजारातील होळी कामाण्णाकडून चव्हाटा होळीला भेट व रात्री 10 वाजता चोर हा पारंपरिक कार्यक्रम. मंगळवार 26 रोजी मंडप सजावट व देवीचे होड, निशाणी, अब्दागिरी यांची प्रत्येक घरोघरी अंगणात पूजन. मुंबईस्थित कणकुंबी ग्रामस्थ मंडळाकडून 11 वाजता चव्हाटा मंदिरमध्ये सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद. रात्री 9.30 वाजता रंगमंचावर रणमाले व 11 वाजता वरदहस्त क्रिएशन केरी सत्तरी (गोवा) आणि विशाल गवस प्रस्तुत कोंकणी कॉमेडी ‘झक्कास 420’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

27 रोजी दुपारी 1 वा. धुलीवंदन कार्यक्रम, त्यानंतर लाड लक्ष्मी, चव्हाटा मंदिरकडून तीर्थ घाटाकडे स्नान करून, चव्हाटा मंदिराला भेट. संध्याकाळी 7 वा. घोडे मोडणी हा धार्मिक कार्यक्रम. रात्री 9 वा.माउलीदेवी नाट्यामंडळ कणकुंबी यांचा संगीत फार्स कालिका अवतार हा सांस्कृतिक कार्यक्रम. रात्री 11 वा. रणमाले कार्यक्रम. 28 रोजी प्रत्येक घरी रणमाले खेळ, त्यामध्ये टिपरी व सांस्कृतिक कार्यक्रम. श्री रवळनाथ मंदिर येथे आदर्श मित्रमंडळ यांच्यावतीने सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद व दुपारी महाप्रसाद. रात्री 10 वा. रणमाले. 11 वा.श्री माउली विद्यालय हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम. 29 रोजी रात्री 9 वा. रणमाले. रात्री 11 वा. रंगसांगाती गोय निर्मित आणि विशाल साळगावकर प्रस्तुत दोन अंकी ‘हाय फाय लाइफ’ हा कोंकणी नाटक तर  30 रोजी सकाळी 8 वाजता श्री माउली देवीच्या पालखीची श्री रामेश्वर मंदिर, माउलीदेवी मंदिर, रवळनाथ मंदिर व वीर मंदिरला भेट व चव्हाटा मंदिरकडे आगमन, त्यानंतर ग्रामस्थांचे श्रीफळ वाढविणे. दुपारी रंगपंचमीला सुरुवात. 4 वाजता श्री माउली देवीची ओटी भरण्याचा सौभाग्यवतींचा कार्यक्रम. घाऱ्हाणे आणि रात्री 10 वा. रणमाले हा कार्यक्रम. त्यानंतर ‘मागणीचा गणपती’ हा सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहे. 31 रोजी तुलाभाराचा कार्यक्रम झल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

Advertisement
Tags :

.