कणकुंबी शिमगोत्सवाला आजपासून प्रारंभ
आठ दिवसात विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन : 20 रोजी सांगता
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी भागातील शिमगोत्सवाला गुरुवार दि. 13 रोजी प्रारंभ होणार असून सदर कार्यक्रम दि. 20 मार्चपर्यंत चालणार आहेत. आठ दिवस चालणाऱ्या या शिमगोत्सवात विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कणकुंबीसह परिसरातील चोर्ला, माण, पारवाड, हुळंद, चिगुळे, बेटणे, चिखले, आमगाव आदी गावात सांस्कृतिक, पारंपरिक, धार्मिक कार्यक्रम होत असतात. मुख्यत रणमाले, टिप्परी, घोडेमोडणी, नाटक किंवा इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गुरुवार दि. 13 रोजी दुपारी 12 वा. होळीचे गाऱ्हाणे, सायंकाळी होळी आणण्यासाठी प्रस्थान, रात्री 8 वाजता श्री माउली देवीच्या पालखीचे चव्हाटा मंदिरापर्यंत आगमन व स्थानापन्न. शुक्रवार दि. 14 रोजी होळीचे गावच्या वेशीतून आगमन होणार आहे. दुपारी 12 वाजता होळी उभारणी आणि बाजार गल्लीमधील होळी कामण्णा पेटविणे तसेच रात्री 8 वा. बाजार गल्लीतील होळी कामण्णाकडून चव्हाटा मंदिराकडे होळी भेटीचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 वाजता पारंपरिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहे. दि. 15 रोजी सत्यनारायण महापूजा, कोकणी कॉमेडी नाटक ‘आवय तिरंगी आणि मम्मी फिरंगी’ होणार आहे.
दि. 16 रोजी प्रत्येक घरासमोर धुळवड, नंतर लाडलक्ष्मी कार्यक्रमानंतर चव्हाटा मंदिराला भेंट. सायंकाळी 7 वा. ‘घोडेमोडणी’ कार्यक्रम होणार आहे. रात्री 9 वा. माउलीदेवी नाट्यामंडळ कणकुंबी सहर्ष सादर करणार आहेत. एक अंकी ‘संत गोरा कुंभार’ हा फार्स सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रात्री 11 वा. रणमाले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 रोजी सकाळी घरोघरी रणमाले, टिप्परी, राधा व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दि. 18 रोजी ‘रंग सांगाती गोय’ निर्मित आणि विशाल साळगावकर प्रस्तृत दोन अंकी कोकणी नाटक ‘बायको माजी सायको’ या नाटकाचे आयोजन केले आहे. दि. 19 रोजी रंगपंचमीनिमित्त माउलीदेवी पालखीची रामेश्वर रवळनाथ व विरदेव या देवतांची भेट, गाऱ्हाणे व त्यानंतर चव्हाटा मंदिराकडे आगमन होणार आहे. दुपारी 4 वा. महिलांचा ओटी भरणे व मागणी होईल. रात्री 10 वा. रणमाले कार्यक्रमात म्हसोबा हा धार्मिक कार्यक्रम, होळींचा लग्न सोहळा, गणेश पूजन आणि मागणी कार्यक्रम असे कार्यक्रम पार पडणार आहेत. दि. 20 रोजी माउली देवीची पालखी चव्हाटा मंदिरापासून पुन्हा माउली मंदिराकडे प्रस्थान व तुलाभार कार्यक्रम होऊन शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.