कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील मोफत सिटीस्कॅन सेवा बंद; शासनाकडून देय रक्कम न मिळाल्याने कंपनीचा निर्णय
कणकवली प्रतिनिधी : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध असलेली मोफत सिटीस्कॅन सुविधा बंद करण्यात आली आहे. ही सेवा देणाऱ्या कृष्णा डायग्नोस्टिक्स लिमिटेड या कंपनीला शासनाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून देय असलेली रक्कम मिळाली नसल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. आता सिटीस्कॅन सेवा शासनाकडून कंपनीला लागू असलेल्या दरानुसार शुल्क आकारून देण्यात येणार आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे नागरिकांना विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या घोषणा करतात. त्याच अनुषंगाने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची सुविधा मोफत उपलब्ध होती. मात्र, ही सेवा पुरविणाऱ्या कंपनीची अनेक महिन्यांची देयके शासनाकडे प्रलंबित असल्याने अखेर कंपनीने मोफत सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीकडून थकीत रकमेबाबत शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीने मोफत सिटीस्कॅन सेवा बंद करून शासनाकडून कंपनीला देण्यात येणाऱ्या दरानुसार सेवा देण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
सिटीस्कॅनसाठी आता 704 ते 4,220 रुपयांपर्यंत शुल्क
मोफत सेवा बंद झाल्याने आता सिटीस्कॅनच्या प्रकारानुसार रुग्णांना 704 ते 4,220 शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सर्वसामान्य रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
एकीकडे नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या घोषणा होत असताना दुसरीकडे संबंधित सेवा देणाऱ्या कंपनीची देयके वेळेत न मिळाल्याने सुविधा बंद होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाच्या दिरंगाईचा फटका थेट सर्वसामान्य रुग्णांना बसत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
मोफत सिटीस्कॅन सुविधा पूर्ववत करण्यासाठी शासनाने प्रलंबित देयके तातडीने अदा करून रुग्णांची होणारी आर्थिक गैरसोय दूर करावी, अशी मागणी आता होत आहे.