For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोंद असलेल्या शेतपाणंद रस्त्यांची अंदाजपत्रके तातडीने तयार करा; कणकवली समितीचा निर्णय; पहिल्या टप्प्यात तीन तालुक्यांतील प्रत्येकी 10 कामांना प्राधान्य

12:35 PM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
नोंद असलेल्या शेतपाणंद रस्त्यांची अंदाजपत्रके तातडीने तयार करा  कणकवली समितीचा निर्णय  पहिल्या टप्प्यात तीन तालुक्यांतील प्रत्येकी 10 कामांना प्राधान्य
Advertisement

कणकवली | प्रतिनिधी : मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेअंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत शेतपाणंद रस्त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या रस्त्यांच्या नकाशावर आणि सातबारा उताऱ्यावर नोंदी आहेत, अशा रस्त्यांची अंदाजपत्रके तातडीने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

कणकवली तहसीलदार कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना कणकवली विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत नोंदणीकृत शेतपाणंद रस्ते, रस्त्यांचे हस्तांतरण आणि प्रस्तावित कामांचा प्राधान्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कणकवली विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये रस्ते किंवा शेतपाणंद रस्त्यांचे हस्तांतरण आवश्यक आहे, तसेच नोंदणीकृत रस्त्यांची कामे प्राधान्याने करणे गरजेचे आहे, अशा रस्त्यांची माहिती ग्रामपंचायत पातळीवरून तातडीने संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Advertisement

पहिल्या टप्प्यात कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांतून प्रत्येकी 10 कामांची मागणी घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. या कामांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील बैठक घेऊन त्यांना मंजुरी देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी आवश्यक रस्ते उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील वाहतूक सुविधा सुधारणे हा योजनेचा उद्देश आहे.

बैठकीला सहअध्यक्ष संदीप साटम, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, देवगड व वैभववाडीचे संबंधित अधिकारी तसेच समिती सदस्य जनार्दन तेली, महेश संसारे यांच्यासह भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम आणि अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.