कणकवली कनकनगरमध्ये पाणी अडविले; मराठा मंडळ बंधाऱ्यावर लोखंडी प्लेटची प्रतीक्षा
कणकवली शहरासाठी गड नदी हा महत्त्वाचा जलस्रोत आहे. या नदीवर कनकनगर आणि मराठा मंडळ परिसरात केटी बंधारे उभारण्यात आले आहेत. पावसाळ्यात नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. हे पाणी अडवून साठा निर्माण केल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही बंधाऱ्यांवर लोखंडी प्लेटी बसविणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
काही दिवसांपूर्वी कनकनगर येथील केटी बंधाऱ्यावर लोखंडी प्लेट बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पाणी अडविण्यात आले असून बंधाऱ्यामागील बाजूस पाणीसाठा निर्माण झाला आहे. प्लेटींवरून पाणी पुढे वाहत असल्याचेही दिसून येत आहे. या उपाययोजनेमुळे पाणी अडविण्याच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम दिसून येत असताना मराठा मंडळ येथील बंधाऱ्यावरही अशीच कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कनकनगर येथील बंधाऱ्याप्रमाणे मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्यावरही लोखंडी प्लेट बसविल्यास गड नदीतील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. शहरातील उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करून भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कमी करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे.
त्यामुळे प्रशासनाने मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्याची पाहणी करून आवश्यक लोखंडी प्लेट बसविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. कनकनगर येथे केलेल्या उपाययोजनेप्रमाणे मराठा मंडळ बंधाऱ्यावरही प्लेट बसवून पाणी अडविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
