बिहार मुख्यमंत्र्यांविरोधात कन्हैया कुमारचे आंदोलन
अनेक काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
वृत्तसंस्था/ पाटणा
काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना शुक्रवारी पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभान, बिहार युवक काँग्रेसचे अध्यक्ष गरीबदास यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी कारवाई केली.
कन्हैया कुमारच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने शुक्रवारी ‘स्थलांतर थांबवा, नोकऱ्या द्या’ या मागणीसाठी मोर्चा काढला होता. त्यांची पदयात्रा शुक्रवारी ऐतिहासिक गांधी आश्रमातून पाटणा येथे पोहोचल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री भवनाकडे कूच करत निवासस्थानाला घेराव घालण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रथम पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. तरीही आंदोलकांनी पुढे कूच केल्याने पोलिसांनी कडकपणा दाखवत सर्वांना ताब्यात घेतले. यानंतर वातावरण शांत झाले. काही वेळानंतर सर्व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.
नितीशकुमारांवर टीकास्त्र
पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी कन्हैया कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भाजपने आपल्या ताब्यात ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. वास्तविक नितीश कुमारांमुळेच केंद्रात मोदी सरकार सत्तेत आहे. मात्र, राज्यातील रोजगाराच्या प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. माझी लढाई बेरोजगारीविरुद्ध आहे, असे ते पुढे म्हणाले. पदयात्रेच्या समारोपावेळी पाटणा येथे पोहोचलेले काँग्रेस सरचिटणीस सचिन पायलट यांनीही नितीश कुमार आणि जेडीयू सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी विशेषत: पेपरफुटीसारख्या मुद्द्यांवरून बिहार सरकारला धारेवर धरले.