कंग्राळी खुर्द मार्कंडेय नदीला दुसऱ्यांदा पूर
नदीकाठ शिवारात पाणी शिरल्याने भातरोप कुजण्याच्या मार्गावर
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
गेले दोन दिवस पडत असलेल्या आर्द्रा नक्षत्राच्या संततधार अतिवृष्टीमुळे कंग्राळी खुर्द गावाजवळून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला दुसऱ्यांदा पूर आल्यामुळे नदीपात्रातील पाणी नदीकाठ शिवारामध्ये पसरले आहे. यामुळे भातरोप लागवडीसाठी टाकलेले भातरोप पुरते कुजून जाणार असून भातरोप लागवड कशी करायची, ही चिंता नदीकाठ शिवारातील शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसून येत आहे. यावर्षी अवकाळी पावसापासून रोहिणी, मृग व आर्द्रा या तिन्ही नक्षत्रानी संततधार मुसळधार पावसाला सुरुवात केल्यामुळे यावर्षीची भातपेरणी व भात रोप लागवडीसाठी तरवे घालणे हंगाम मिळाले नाही. त्यातच भातपेरणी केलेले व भातरोप लागवडीला घालण्यात आलेले तरवे पावसाने उघडीप न दिल्यामुळे उगवून आलेले, पेरणी केलेले व रोप लागवडीसाठीचे कोवळे रोप पाण्यामुळे कुजून गेले.
यामुळे परत गैर हंगामातसुद्धा शेतकरी वर्गाने परत रोप तरवे टाकले. परंतु तेही आर्द्रा नक्षत्राच्या संततधार अतिवृष्टीमुळे कुजून जाण्याच्या वाटेवर आहे. यामुळे यावर्षी भातरोप लागवडीचा मोठा गंभीर प्रश्न शेतकरी वर्गासमोर तयार असल्याचे चित्र दिसून येत आहे. कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, जाफरवाडी, गौंडवाड आदी गावाजवळील शेतवडीतून मार्कंडेय नदी वाहते. नदीकाठ शिवारामध्ये सदर गावातील शेतकरी प्रत्येक वर्षी रोपलागवड करतात. नदीच्या पुरामुळे पेरलेले भात रोप कुजून जाते म्हणून कुणीही पेरणी करत नाही. परंतु यावर्षी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावून शेतकरीवर्गाची झोप उडविली दिली. त्यातच भातपेरणी व रोप तरवे घालण्यासाठी योग्य हंगाम न दिल्यामुळे गैरहंगामामध्ये केलेली भात पेरणी व भात रोप तरवे संततधार अतिवृष्टीमुळे कुजून गेल्यामुळे भातरोप लागवडीसाठी भात रोपांची मोठी तूट पडणार असल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.