कंग्राळी बुद्रुक लक्ष्मी यात्रेची उत्साहात सांगता
गावावर तुझी कृपादृष्टी राहू दे, अशी मनोमनी मागणी : दोन लाखांहून अधिक भाविकांचा अलोट जनसागर
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
श्री लक्ष्मी माता की जय, हर हर महादेव.., श्री लक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत गेले नऊ दिवस सुरू असलेल्या लक्ष्मीदेवी यात्रेची मोठ्या जल्लोषात धार्मिकतेने व उत्साहात बुधवारी गदग ठिकाणाहून गावच्या पूर्व दिशेला असलेल्या सीमेकडे प्रस्थान केल्यानंतर सांगता झाली. यावेळी श्री लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. कंग्राळी बुद्रुक गावची पहिली यात्रा भारत देश 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि अगदी तीन वर्षातच म्हणजे 1050 साली पहिली यात्रा पार पडली. त्यानंतर 33 वर्षांनी म्हणजे 1983 साली दुसरी यात्रा पार पडली. तर तब्बल 43 वर्षांनी 28 एप्रिल 2026 रोजी या गावची तिसरी यात्रा अगदी शांततेत पार पडली.
यात्रा काळात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर बाजुला ठेवण्यात आलेल्या चोख पार्किंगमुळे भाविकांना आपली वाहने पार्किंग करू यात्रेचा आनंद लुटता आला. तसेच संपूर्ण गावभर कुणीही आपल्या घरावर विद्युत रोषणाई केली नसल्यामुळे नऊ दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला नाही. तसेच काकती पोलीस स्टेशन, महांतेशनगर पोलीस स्टेशन, एपीएमसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मोठा पोलीस फाटा तैनात केल्यामुळे तसेच यात्रेला आलेल्या भाविकांनीसुद्धा मनात धार्मिकता ठेवून यात्रेचा आनंद घेतल्यामुळे यात्रा मोठ्या उत्साहात, जल्लोषात व शांततेत पार पडली.
विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने
बुधवारी यात्रेची सांगता होणार असल्यामुळे सकाळी काकडा आरतीसह इतर विधीवत कार्यक्रम झाले. दुपारी धार्मिक विधींना प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री कलमेश्वर मंदिराचे पुजारी विवेक पुजारी, श्री लक्ष्मीदेवीचे पुजारी मोनाप्पा सुतार, देवस्थान पंचकमिटी, यात्रोत्सव कमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मीदेवीची विधीवत पूजा करून आरती म्हणण्यात आली. यावेळी विवेक पुजारी यांनी मंत्रपठण केले. यानंतर गावातील प्रत्येक कुटुंबावर तुझी अशीच कृपा असू दे म्हणून गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर परत दही भाताचा नैवैद्य दाखवून परत विधीवत पूजा केल्यानतंर श्री लक्ष्मीदेवीला गदगेवरुन उचलून भाविकांनी खांद्यावर घेतल्यानंतर श्री लक्ष्मीदेवीने धार्मिक व्हन्नाट कार्यक्रमाला प्रारंभ केला. यावेळी थोडावेळ गदग ठिकाण परिसरात व्हन्नाट खेळ खेळल्यानंतर श्री लक्ष्मीदेवीने गावच्या पूर्व दिशेला असलेल्या सीमेकडे प्रस्थान केले. श्री लक्ष्मी देवीची यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्राम पंचायत माजी सदस्य, देवस्थान पंचकमिटी, श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सव कमिटी, विविध युवक मंडळे, महिला मंडळे व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.
बेळगाव जिल्ह्यासह तालुक्यामध्ये भव्य दिव्य यात्रा
कंग्राळी बुद्रुक गावची यात्रा बेळगाव जिल्ह्यासह तालुक्यामध्ये एक भव्यदिव्य यात्रा साजरी होणार तसेच सदर यात्रेला भाविकांची दररोज लाख, दीड लाख भाविकांची दर्शनासाठी उपस्थिती राहणार अशी दररोज यात्राकमिटीच्या होत असलेल्या बैठकांमध्ये चर्चा होती आणि 24 एप्रिल पासून 6 मे पर्यंत सुरू असलेल्या या यात्रेमध्ये ही परिस्थिती हककीतमध्ये आल्याचे धार्मिक चित्र दिसून आले. तसेच श्री लक्ष्मी देवीच्या आशिर्वादाने गेले नऊ दिवस निसर्गाने सुद्धा चांगली साथ दिली. यामुळे भाविकांना यात्रेचा आनंद घेता आला. एकूण सदर यात्रा मोठ्या भव्यदिव्य मोठ्या धार्मिकतेने व मोठ्या जल्लोषात साजरी झाल्याचे दिसून आले.