For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुकचा किगदी तलाव जलपर्णीच्या विळख्यात

10:34 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुकचा किगदी तलाव जलपर्णीच्या विळख्यात
Advertisement

सांडपाणी-अतिक्रमणामुळे तलावाचे सौंदर्यीकरण हरवले : कोट्यावधी रुपयांचा निधी वाया : रस्त्यालाही पडले भगदाड

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी बुद्रुक गावच्या दक्षिणेला असलेला मोठ्या व्यासाचा किगदी तलाव जलपर्णीच्या विळख्यात सापडल्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी सदर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी वापरण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा निधी जलपर्णीमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. त्यातच तलावाच्या सौंदर्यीकरणाचेही काम अपूर्णच असल्यामुळे संपूर्ण तलावाभोवती हिरवीगार जलपर्णीच दिसत आहे. त्यातच तलावामध्ये अतिक्रमण होत असल्यामुळे तलावाचे अस्तित्व नाहीसे होणार आहे. सार्वजनिक पाटबंधारे खाते व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन तलावाचे उरलेले काम पूर्ण करून जलपर्णीची विल्हेवाट लावून तलावाचे सौंदर्यीकरण फुलविण्याची मागणी पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

Advertisement

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा उद्देश मनाशी बाळगून गावातील जुन्या काळातील विचारधारी मंडळींनी शासनाच्या नजरेस सदर जागा निदर्शनास आणून गावाजवळील तलावाची निर्मिती व गावच्या दक्षिण दिशेला किगदी तलावाची निर्मिती करून घेतल्याचे सांगण्यात येते. गावाजवळील तलावामुळे गावातील सार्वजनिक विहिरीबरोबर तलावाच्या पश्चिम दिशेला असलेली शेतजमीन पाऊस लांबल्यास ओलिताखाली आणण्यास मदत होत होती. तसेच गावातील सर्व विहिरींना पाण्याचा पाझर राहणे तसेच पाऊस लांबल्यास किगदी तलावाच्या पाण्यावर ग्रामस्थांना कधीच दुष्काळाला सामोरे जावे लागत नाही. अशा या दोन्ही तलावामुळे गावच्या सौंदर्यीकरणात एक वेगळीच भर दिसून येते. गेल्या 25 वर्षांच्या पूर्वी किगदी तलावातील पाणी अगदी जनावरांबरोबर माणसेसुद्धा पिण्यासाठी वापरत होते. परंतु बेळगावनगरीची उपनगरांची निर्मिती तसेच केएलई हॉस्पिटलची निर्मिती या उपनगरांचे सांडपाणी तसेच केएलई हॉस्पिटलचे सांडपाणी या तलावामध्ये मिसळत असल्यामुळे सध्या हे पाणी जनावरेसुद्धा पित नाहीत, अशी परिस्थिती या तलावाची झाली.

तलावांच्या सौंदर्यीकरणासाठी 3 कोटीचा निधी

कंग्राळी बुद्रुकजवळील तलाव व किगदी तलाव या दोन्ही तलावांच्या सौंदर्यीकरणासाठी गेल्या तीन वर्षापूर्वी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून तीन कोटी रुपये मंजूर झाले होते. यामध्ये गावाजवळील तलावाला 1 कोटी 10 लाख रुपये तर किगदी तलावासाठी 1 कोटी 90 लाख रुपये मंजूर झाले होते. गावाजवळील तलावाचे काम थोडे व्यवस्थित झाले आहे. दोन वर्षातच तलावामध्ये गणेशचुतर्थीला गणपती विसर्जन करण्यासाठी बांधण्यात आलेले गणेश विसर्जन कुंड मागीलवर्षी कोसळले. तसेच तलावाच्या चारही बाजूने काँक्रिटीकरण करण्यात आलेले रस्तेसुद्धा कंत्राटदाराच्या निकृष्ट कामामुळे गणेश विसर्जन कुंड पडले. तर काँक्रिट रस्ते दोन वर्षातच उखडून गेले आहेत. किगदी तलावाचे काम तर अजून अपूर्णच आहे. तलावाच्या पश्चिम बांधावर तयार करण्यात आलेल्या काँक्रिट रस्त्यावरही मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे शासनाचा निधी पाण्यामध्ये गेल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.

जलपर्णीची विल्हेवाट लावून तलावाचे सौंदर्यीकरण अबाधित ठेवण्याची मागणी

तलावांचे सौंदर्यीकरण अबाधित राखणे तसेच मॉर्निंग वॉकर्स व ग्रामीण भागामध्ये या तलावांच्या सौंदर्यीकरणामुळे गावच्या सौंदर्यात भर घालणे हा उद्देश ठेवून शासनाने तलावांचे सौंदर्यीकरण करण्याचा चांगला उपक्रम राबविला आहे. परंतु तलावांचे काम करतेवेळी नियोजन राखणेही तितकेचे जरुरीचे आहे. कारण किगदी तलावाचा व्यास मोठा आहे. सदर तलावाच्या चोहोबाजूने चांगल्या वस्तीतील उपनगरांची निर्मिती झाली आहे. किगदी तलावाच्या बाबतीत पाहिले तर पाटबंधारे खात्याने जातीने लक्ष देऊन तलावाचे काम व्यवस्थित होत आहे की नाही, तलावात जलपर्णी किंवा तलावाच्या बाजूने वाढलेली झुडुपे काढून सौंदर्यीकरण अबाधित ठेवणे गरजेचे आहे. परंतु किगदी तलावाच्या बाबतीत नियोजन चुकीचे झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. यामुळे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन किगदी तलावातील जलपर्णीची विल्हेवाट लावून तलावामध्ये होत असलेले अतिक्रमण थांबवून तलावाचे सौंदर्यीकरण फुलविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.