कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षांवरील अविश्वास ठराव बारगळला
धारवाड हायकोर्टकडून स्थगिती : 16 रोजी सदस्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
गावच्या विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षा कौसरजहाँ बंदेनवाज सय्यद यांच्या विरोधात ग्रा. पं. च्या 25 सदस्यांनी साहाय्यक आयुक्तांकडे दिलेल्या अविश्वास ठरावाला कौसरजहाँ सय्यद यांनी धारवाड हायकोर्टातून स्थगिती (स्टे) मिळविली आहे. त्यामुळे गुरुवार दि. 12 रोजी त्यांच्यावर संमत होणारा अविश्वास ठराव बारगळल्यामुळे कौसरजहाँ सय्यद यांना दिलासा मिळाला. परंतु त्या 25 सदस्यांची घोर निराशा झाली आहे. पंचायतमध्ये 13 वॉर्ड असून, सदस्य संख्या 34 आहे.
2021 मध्ये ग्रा. पं. निवडणूक झाल्यावर संध्या चौगुले यांची अध्यक्षपदी तर अनिल पावशे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. परंतु थोड्याच दिवसात अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाला होता. त्यानंतर चार वर्षांनी अध्यक्षा कौसरजहाँ सय्यद यांच्यावरही 25 सदस्यांनी अविश्वास ठराव संमत अर्ज साहाय्यक आयुक्तांकडे सुपूर्द केला होता. परंतु गुरुवारी सय्यद यांनी धारवाड हायकोर्टाकडून स्थगिती मिळविल्याने त्यांच्यावरील अविश्वास बारगळला. ऑक्टोबरमध्ये ग्रा. पं. च्या 25 सदस्यांनी साहाय्यक आयुक्तांकडे अध्यक्षांवर अविश्वास संमत करण्यासंदर्भात अर्ज दिला होता. त्यानंतर गुरुवार दि. 12 रोजी ग्रा. पं. सभागृहामध्ये हजर राहण्याचे नोटिसीद्वारे कळविले होते.
अविश्वास ठरावाला स्थगिती
दि. 12 रोजी दुपारी 12 वाजता साहाय्यक आयुक्त श्रवण नाईक ग्रा. पं. कार्यालयामध्ये उपस्थित झाले. यावेळी सर्व 25 सदस्य हजर होते. यानंतर अध्यक्षांच्या वकिलाने धारवाड हायकोर्टातून कौसरजहाँ यांच्यावरील अविश्वास ठरावाला स्थगिती मिळविल्याची कागदपत्रे हजर केली. कागदपत्रांची पडताळणी करून श्रवण नाईक यांनी अविश्वास ठरावाला स्थगिती मिळाल्याचे जाहीर केले.
16 रोजी सदस्यांना कोर्टात हजर राहण्याचे आवाहन
16 डिसेंबर रोजी सर्व 25 सदस्यांना कोर्टात हजर राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी 26 सदस्य उपस्थित होते. 8 सदस्य अनुपस्थित होते. यावेळी पीडीओ गोविंद रंगापगोळ, तलाठी कुगजी व सहकारी उपस्थित होते.
हा तर लोकशाहीचा अवमान
कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षा कौसरजहाँ बंदेनवाज सय्यद या गेल्या सहा महिन्यांपासून मासिक बैठकीला गैरहजर रहात होत्या. त्यामुळे शासनाकडून गावच्या विकासासाठी आलेला फंड विकासाचे नियोजन न होत असल्यामुळे परत जात होता. यामुळे गावचा विकास खुंटला आहे. आम्ही 25 सदस्य अविश्वासाच्या ठरावास सामोरे गेलो होतो. परंतु विद्यमान अध्यक्षांनी हायकोर्टाकडून मिळविलेली स्थगिती लोकशाहीचा अवमान असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
- ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील
अध्यक्षांच्या अनुपस्थितीमुळे विकासाला खीळ
अध्यक्षा कौसरजहाँ बंदेनवाज सय्यद यांच्या अनुपस्थितीमुळे गावचा विकास खुंटत चालला आहे. अनेकांनी केलेल्या विकास कामांची बिले अडकून पडली आहेत. तसेच गावच्या विकास कामांचे नियोजन थांबले आहे. शासनाकडून विकास कामासाठी आलेला 70 लाख रुपये निधी परत गेला. यामुळे गावचा विकास खुंटला आहे. विद्यमान अध्यक्षांनी हायकोर्टाकडून अविश्वास ठरावाला मिळविलेल्या स्थगितीमुळे लोकशाही संपल्याची खंत व्यक्त केली.
- ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील