For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांगारूंनी दीड दिवसात जिंकली कसोटी

06:55 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
कांगारूंनी दीड दिवसात जिंकली कसोटी
Advertisement

दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर 1 डाव आणि 51 धावांनी विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ मॅके

ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त कमबॅक करत अवघ्या दीड दिवसांतच सामना जिंकण्याचा पराक्रम केला. मॅके येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा एक डाव आणि 51 धावांनी पराभव केला. पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात जोरदार पलटवार करत दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवली. मालिकेत एकूण 20 बळी घेणाऱ्या मिचेल स्टार्कला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना दीड दिवसात संपला. 22 ऑगस्टला सुरु झालेला सामना 23 ऑगस्टला संपला. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना, स्टार्क आणि कमिन्सच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ 64 धावांत ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियालाही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही; ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 210 धावा केल्या. त्यांना केवळ 146 धावांची आघाडी घेता आली. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 165/8 च्या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. ग्रीन 51 धावांवर आणि नॅथन लायन 10 धावांवर खेळत होता. दोघांनी नवव्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. ग्रीनने 67 धावांची खेळी केली. लायन 32 धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर जोश हेजलवुडसोबत त्याने शेवटच्या विकेटसाठीही 24 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ 210 धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांना 146 धावांची आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावातही बांगलादेशची दाणादाण

146 धावांच्या आघाडीनंतर बांगलादेशसमोर सामना वाचवण्याचे आव्हान होते. पण स्टार्कने नव्या चेंडूने पुन्हा एकदा सलग बळी घेतले. त्याने शादमान इस्लाम आणि मोमिनुल हक यांना सलग चेंडूंवर बाद केले. त्यानंतर पॅट कमिन्सने तंजीद हसनला बाद केले. अवघ्या 24 धावांवर तीन विकेट्स गमावल्यानंतर कर्णधार नजमुल हुसैन शांतो आणि मुशफिकुर रहीम यांनी 27 धावांची भागीदारी करत डावाला थोडा आधार दिला. पण, फिरकीपटू नॅथन लायनने शांतोला बाद करत ही भागीदारी मोडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट्सची रांग लागली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकल्याचे पहायला मिळाले. टी-ब्रेकनंतर लगेचच बांगलादेशचा डाव संपुष्टात आला. मुशफिकुर रहीमने एका बाजूने झुंज देत  नाबाद 29 धावा केल्या, तर कर्णधार नजमुल हुसैन शांतोने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 4 तर कमिन्स आणि लायनने प्रत्येकी 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलकबांगलादेश पहिला डाव 64 आणि दुसरा डाव 38.3 षटकांत सर्वबाद 95 (नजमुल शांतो 31 रहीम नाबाद 29, तस्कीन अहमद 8, स्टार्क 4 बळी, कमिन्स आणि लायन प्रत्येकी 3 बळी).

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 52.3 षटकांत सर्वबाद 210 (स्टीव्ह स्मिथ 42, ग्रीन 67, लायन नाबाद 32, शोरिफुल इस्लाम 7 बळी) .

स्टार्क विजयाचा हिरो

ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो मिचेल स्टार्क. पहिल्या डावात त्याने अवघ्या 12 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावातही स्टार्कचा धडाका कायम राहिला. त्याने आणखी चार फलंदाजांना माघारी पाठवत सामन्यात एकूण 10 विकेट्स घेण्याची किमया केली. संपूर्ण सामन्यात त्याने 51 धावा देत 10 विकेट्स घेतल्या. ही कामगिरी स्टार्कच्या कसोटी कारकिर्दीतील एका सामन्यातील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.

Advertisement
Tags :

.