कांगारुंच्या 6 षटकात 113 धावा
हेड स्कॉटलंडला नडला, सामना 9 षटकात संपवला
वृत्तसंस्था/एडनबर्ग (स्कॉटलंड)
कांगारुंनी पहिल्या टी-20 सामन्यात स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवला. स्कॉटलंडने विजयासाठी दिलेले 155 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 9.4 षटकांतच पूर्ण केले. ट्रेव्हिस हेडने या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी करत हा सामना विक्रमी केला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी टी-20 सामन्यात पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडविरूद्ध पॉवरप्लेमध्ये म्हणजेच, पहिल्या 6 षटकात 1 बाद 113 धावांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे, टी-20 क्रिकेटमध्ये प्रथमच पॉवरप्लेमध्ये इतक्या धावा केल्या गेल्या.
तीन सामन्यांच्या मालिकेतील बुधवारी खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला व गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑसी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर स्कॉटलंडला 9 बाद 154 धावापर्यंत मजल मारता आली. सलामीवीर जॉर्ज मॉन्से (28 धावा) वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्क झटपट बाद झाला. यानंतर मात्र ट्रेव्हिस हेड व मिचेल मार्श यांनी धावांचा पाऊस पाडला. या दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या अवघ्या 6 षटकांत 113 धावांवर नेली. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील
पॉवरप्लेमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. हेडसोबत मिचेल मार्शने अवघ्या 33 चेंडूत 113 धावा केल्या. हेडने अवघ्या 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने स्कॉटलंडच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करताना अवघ्या 25 चेंडूत 80 धावांची खेळी केली, ज्यात 12 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. मार्शने आपल्या छोटेखानी खेळीत 12 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह 39 धावा केल्या. ऑसी संघाने हा सामना अवघ्या 9.4 षटकांतच संपवला.
कांगारुंचा टी-20 मध्ये विश्वविक्रम
बुधवारी एडनबर्गमधील ग्रेंज क्रिकेट क्लबमध्ये स्कॉटलंड विरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने जबरदस्त फटकेबाजी केली. कांगारुंनी पॉवरप्लेमध्ये 113 धावा करून नवा विक्रम प्रस्थापित केला. टी-20 क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. हा विक्रम करताना ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा विश्वविक्रम मोडला, जो त्यांनी 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 102 धावा करुन केला होता.
टी-20 मध्ये पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या
- ऑस्ट्रेलिया 113/1 वि स्कॉटलंड, 2024
- दक्षिण आफ्रिका 102/0 वि वेस्ट इंडिज, 2023
- वेस्ट इंडिज 98/4 वि श्रीलंका, 2021