हॉलिवूडमध्ये एंट्री करणार कंगना
कंगना रनौत बॉलिवूडमध्ये स्वत:च्या अभिनयाची जादू दाखविल्यावर आता हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. प्रियांका चोप्राप्रमाणे ती देखील हॉलिवूडमध्ये नशीब आजमाविणार आहे. तिच्या हाती एक मोठा प्रोजेक्ट लागला असून यात ती स्कार्लेट स्टेलॉन आणि टायलर पोसीसोबत दिसून येणार आहे. हा एक हॉरर ड्रामा असून याचे नाव ‘ब्लेस्ड बी द इव्हिल’ आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण न्यूयॉर्कमध्ये पार पडणार आहे. सध्या प्रॉडक्शन टीम स्थळांचा शोध घेत आहे. कंगना रनौतचे मागील काही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. अशा स्थितीत तिने आता हॉलिवूडची वाट पकडली आहे.
कंगनाने काही वर्षांपूर्वी हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणार नसल्याचे वक्तव्य केले होते. कंगनाने 2017 साली हॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना मुर्ख संबोधिले होते. परंतु आता तिने स्वत:च्या भूमिकेत बदल करत हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. .‘ब्लेस्ड बी द एव्हिल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग रुद्र करणार आहे. चित्रपटाची कहाणी पाश्चिमात्य पार्श्वभूमीवर आधारित भारताच्या पारंपरिक लोककथेवर आधारित असणार आहे. परंतु कंगनाच्या या चित्रपटातील भूमिकेसंबंधी खुलासा करण्यात आलेला नाही. कंगना हॉलिवूडपटात दिसणार असल्याने चाहते उत्सुक झाले आहेत.