कंगना रणौतचा यू-टर्न
कृषी कायद्यांवरील वक्तव्य मागे : माफीही मागितली
वृत्तसंस्था/ शिमला
कृषी कायद्यांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने माफी मागितली आहे. आपण केलेले वक्तव्य हे माझे वैयक्तिक मत आहे, पक्षाची भूमिका नाही, असे तिने स्पष्ट कले. 2021 मध्ये रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणण्याची आपली मागणी हे वैयक्तिक मत असल्याचे बुधवारी शिमल्यात कंगनाने सांगितले. आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागत असल्याचेही तिने सांगितले.
तीन कृषी कायद्यांना विरोध काही राज्यांमध्येच असल्याचे वक्तव्य कंगना रणौतने मंगळवारी मंडी येथील एका कार्यक्रमात केले होते. शेतकरी हा भारताच्या प्रगतीचा आधारस्तंभ असताना फक्त काही राज्यांमध्ये कृषी कायद्यांना विरोध होत आहे. मी हात जोडून आवाहन करते की शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायदे परत आणले पाहिजेत, असे म्हटले होते. तिच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळे पडसाद उमटताच तिने बुधवारी ट्विटरद्वारे पुन्हा भाष्य केले. ‘आपण केलेले शेतकरी कायद्यांबाबतचे वक्तव्य हे माझे वैयक्तिक मत आहे. हे वक्तव्य विधेयकांवर पक्षाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाही’, असे ट्विट तिने केले.
इन्स्टाग्रामवर माफीनामा
कंगना हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ स्टेटमेंट देखील पोस्ट केले आहे. जेव्हा शेतकरी कायदे प्रस्तावित केले गेले तेव्हा आमच्यापैकी अनेकांनी त्यांचे समर्थन केले. पण पंतप्रधानांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीने ते कायदे मागे घेतले. माझ्या बोलण्याने आणि विचारांनी कोणाची निराशा झाली असेल तर मला माफ करा. मी माझे शब्द मागे घेते, असेही तिने स्पष्टपणे सांगितले आहे.
भाजपचा दुरावा, काँग्रेसचा आरोप
हिमाचल प्रदेशातील भाजपनेही मंडीतील खासदाराच्या वक्तव्यापासून दुरावा घेतला आहे. तर सत्ताधारी पक्ष हे तीन कायदे परत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे हे विधान असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावर हरियाणा प्रत्युत्तर देईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रचंड निदर्शने केली होती. अखेर 2021 मध्ये मोदी सरकारने हे कायदे मागे घेतले होते.