केन रिचर्डसन व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त
वृत्तसंस्था / मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने मंगळवारी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 34 वर्षीय रिचर्डसन बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये सिडनी सिक्सर्स संघात एका वर्षाच्या करारावर सामील झाला होता. परंतु त्याला संघासाठी केवळ दोन सामने खेळता आले. बीबीएलच्या सुरूवातीपासून खेळलेल्या रिचर्डसनने अॅडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स संघांकडून खेळला. 2018-19 मध्ये रेनेगेड्ससोबत त्याने विजेतेपद पटकाविले होते. 142 बळींसह रिचर्डसन बीबीएलच्या इतिहासातील पाचवा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
त्याने सर्वप्रथम इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनद्वारे एक निवेदन जारी केले. रिचर्डसनने ऑस्ट्रेलियासाठी 25 एकदिवशीय आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो यूएईमध्ये 2021 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. तसेच ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या पुढील आवृत्तीतही तो संघात होता आणि त्याने 2019 च्या एकदिवशीय विश्वचषकातही भाग घेतला होता.