कंदलगावात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ठिकाणी महिलांना मारहाण, दागिने-रोख लंपास;पोलिसांकडून तपासाला वेग
कंदलगाव : (प्रतिनिधी : अभिजीत जवळकोटे) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव परिसरात मध्यरात्री घरफोडी आणि जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री एक ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आठ जणांच्या टोळक्याने दोन ठिकाणी चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव गौरप्पा कोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी घरातील दोन वयोवृद्ध महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि 10 हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात आले.
यानंतर विंचूर रोडलगत असलेल्या बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवरही चोरट्यांनी धाड टाकल्याची माहिती आहे. या ठिकाणी महिलांना मारहाण करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेत सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि 70 हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन डीवायएसपी गणेश शिंदे-पाटील, पीएसआय अमितकुमार करपे आणि पीएसआय राज डांगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून, फिंगरप्रिंट तज्ज्ञ, श्वान पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला पाचारण करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, कंदलगाव परिसरात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे आणि शक्य असल्यास घर, वस्ती तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन मंद्रूप पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.