For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांचनताई परुळेकर यांचे निधन

06:03 PM Mar 26, 2025 IST | Pooja Marathe
कांचनताई परुळेकर यांचे निधन
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

महिला सबलीकरणाची चळवळ गेली 33 वर्षे अखंडपणे चालवणाऱ्या स्वयंसिद्धाच्या संस्थापक, संचालिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर ( वय 74) यांचे बुधवारी दुपारी 3 वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी साईक्स एक्स्टेंशन स्वयंसिद्धा ऑफिसमधील सरोज संकुल येथे ठेवण्यात आले आहे. आज (दि. 27) सकळी 9 वाजता स्वयंसिद्धाच्या मुख्य कार्यालयातून अंत्ययात्रा काढून पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कांचनताई परूळेकर यांनी  वयाच्या 13 व्या वर्षापासून सामाजिक कार्य करण्यास प्रारंभ केला. शिक्षणतज्ञ डॉ. व्ही. टी. पाटील यांची मानसकन्या म्हणून त्यांची ओळख होती. ताराराणी विद्यापीठातील उषाराजे हायस्कूलमध्ये त्यांनी 1969 ते 1972 पर्यंत काम केले. 1972 ते 1978 मध्ये शिक्षिका म्हणूक कार्यरत होत्या. 1978 ते 1986 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लिपिक म्हणूक काम पाहिले. 1986 ते 1993 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असिस्टंट मॅनेजर महणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी बँकेची नोकरी सोडून महिला सबलीकरणात स्वत:ला झोकून दिले. उत्तम वक्त्या असल्याने अनेक व्याख्यानमालांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. महिला आणि उद्योग, बचतगट संकल्पना, बचतगट आणि उद्योग, महाराष्ट्रातील तज्ञ व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. संघटीत संस्था आणि महिला सबलीकरणासंदर्भात वारणा सहकार समूह या विषयावर कृती संशोधनासाठी दीड लाख फेलोशिप देवून त्यांचा सन्मान केला होता.

Advertisement

महिला उद्योगजकता विकास आणि अनौपचारिक शिक्षण, बचतगट संकल्पना राबवून राज्यस्तरावरील समुपदेशक म्हणून मान मिळवला. 10 हजार शहरी, 30 हजार ग्रामीण महिलांचे संघटन, 6 हजार 500 उद्योजिका उभ्या केल्या, असून 150 प्रशिक्षिका तयार केल्या आहेत. संस्थाचे कार्य निरंतर राहावे म्हणून 50 हजारहून अधिक महिला, 1 हजार पुरुष यांना व्यवसाय व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण दिले. 3 हजार युवक-युवर्तीना कमवा व शिका मंत्र दिला. महाराष्ट्रातील हजारो बचतगटांना बचतगट संकल्पना समजावून देत अनेकांना उद्योग सुरु करून दिले. महाराष्ट्र, गोवा, बेळगावमधील अनेक संस्थाना महिला सबलीकर कृती योजना आखून कार्यान्वित करून दिली. महिलांद्वारा उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित, कोल्हापूरची स्थापना केली. डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशनची स्थापना करून दुर्गम भागात महिला क्षमता संवर्धन, शेती तंत्र अंतरण, व्यवसाय शिक्षण याद्वारे गावांचा कायापालट केला. कोंबडीपालन, गांडूळ खतनिर्मिती, सामुदाईक शेती, कंत्राटी शेती, पोषणबाग, अळिंबी उत्पादन, मधमाशा पालन, अपारंपरिक उर्जा साधनांचे अनेक ठिकाणी अनुकरण केले आहे. नापास व गरजू गरीब मुलींसाठी स्वयंसिद्धा स्कूल सुरु करून उत्तम उद्योजिका तयार केल्या. वनविभागातर्फे महिला बचतगटांना महाराष्ट्रभर फिरून मार्गदर्शन केले.

जिल्हापरिषदेच्या बचतगट चळवळीसाठी प्रशिक्षिका तयार करून दिले. शासनाच्या प्रायोगिक प्रकल्पांना तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले.गडहिंग्लज येथील देवदासी प्रशिक्षण केंद्रातील 72 देवदासी व ग्रामीण गरीब महिलांचे पुनर्वसन केले. त्यांना फाय फाऊंडेशन, इचलकरंजी, महिला चेतना पुरस्कार, जॉन दळवी अॅवॉर्ड, मुंबई, जिन हॅरीस इंटरनॅशनल रोटरी अॅवॉर्ड, काकासाहेब सुपनेकर अॅवॉर्ड, ज्ञानप्रबोधिनी, पुणे कोल्हापूर भूषण, सारडा समानसंधी पुरस्कार, सहयाद्री नवरत्न रत्नशारदा पुरस्कार, गुरुवर्य पुरस्कार, रत्नागिरी, मृत्युंजय पुरस्कार, पुणे, जीवन साधना पुरस्कार- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शोभाताई कोरे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार, भारतीय नारी रत्न पुरस्कार, गोवा, सन्मान सी शक्तीचा पुरस्कार- चंद्रकांत जाधव फौंडेशन, पुण्यातील महादेव बळवंत नातू सेवागौरव पुरस्कार, डॉ. अनिल गांधी प्रतिभावंत पुरस्कार, चाणक्य परिवार पुणे, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, स्वातंत्र्यवीर मंडळ, निगडी पुणे, श्रीमती रत्नमाला याळी नारीशक्ती पुरस्कार गडहिंगल्ज आदी पुरस्कार मिळाले आहेत.

Advertisement
Tags :

.