बेळगावच्या कामेशला दसरा ‘कंटीरवा’ किताब
कडोलीच्या स्वाती पाटीलला दुहेरी मुकुटसह चांदीच्या गद्याची मानकरी
बेळगाव : म्हैसूर येथे दसरा महोत्सव निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दसरा कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या कामेश पाटील-कंग्राळीने भद्रावतीच्या किरणला 4-0 अशा गुण फरकाने पराभव करून ‘दसरा कंटीरवा केसरी किताब’ पटकाविला. कडोलीच्या स्वाती पाटीलने सीएम चषक व दसरा किशोर लढतीत विजय संपादन करून दुहेरी मुकुट मिळविले. येथील देवराज अर्स स्टेडियमवर झालेल्या दसरा महोत्सव कुस्ती स्पर्धेत मुलींच्या विभागात झालेल्या सीएम चषक कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीच्या कुस्तीत स्वाती पाटीलने आकांक्षाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात स्वाती पाटीलने शालिना सिद्धीचा पराभव करून सीएम चषकावर आपले नाव कोरले. तर दसरा किशोर स्पर्धेत उपांत्य फेरीत स्वातीने मनीषा सिद्धीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत स्वाती पाटीलने प्रतीक्षा भावीचा पराभव करून दसरा किशोर किताब पटकाविला. तिला मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा, मानाचा किताब, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुलांच्या विभागात दसरा कंटीरवा केसरी किताबासाठी बेळगावचा कामेश पाटील कंग्राळी व भद्रावतीचा किरण यांच्यात लढत झाली. या लढतीत 8 व्या मिनिटाला कामेश पाटीलने एकेरीपट काढून किरणवर कब्जा मिळवित एक गुण घेत 1-0 ची आघाडी घेतली.
किशोर स्पर्धेत दावणगिरीच्या संजू कोरवरने कुमार नाथगुऊचा पराभव करून दसरा किशोर किताब पटकाविला. दसरा कुमार स्पर्धेत म्हैसूर विभागाच्या चेतनने चेतनगौडाचा पराभव करून दसरा कुमार हा मनाचा किताब पटकाविला. वरील सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा, मानाचा किताब प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ. विनोद कुमार-म्हैसूर, हनुमंत पाटील-स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगाव, स्वाती पाटील-बेळगाव, तुकाराम गौडा-हल्ल्याळ, काडेश नामगौडा, राजू फाळके-शिमोगा, मंजू मादर बेळगाव, सुनील ठाणब-बेडगेरी, मनोज बिर्जे-किणये यांनी काम पाहिले.