अध्यक्षीय चर्चेत कमला हॅरिस ठरल्या सरस
डोनाल्ड ट्रम्प यांना वरचढ : डेमोक्रेटिक पार्टीचा उत्साह दुणावला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस या रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी झालेल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये हॅरिस यांनी गर्भपाताचा मुद्दा, ट्रम्प यांचे आरोग्य आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यांचा दाखला देत त्यांना लक्ष्य केले. कमला हॅरिस यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ट्रम्प यांना बचावात्मक स्थितीत यावे लागले. वादविवादादरम्यान 59 वर्षीय हॅरिस यांनी विचारलेल्या प्रश्नांवर 78 वर्षीय माजी अध्यक्ष ट्रम्प हे वारंवार त्रस्त होताना दिसून आले. यावेळी त्यांचा अस्वस्थपणाही स्पष्टपणा दिसला, याचा परिणाम म्हणून आता सर्वेक्षणांमध्ये हॅरिस यांना आघाडी मिळाली आहे.
ट्रम्प यांच्या भाषणशैलीमुळे त्यांच्या सभांमधून लोक कंटाळून लवकर निघून जातात अशी टीका कमला हॅरिस यांनी केली. दोन्ही उमेदवारांदरम्यान इमिग्रेशन, विदेश धोरण आणि आरोग्य सेवा यासारख्या मुद्द्यांवर वाक्युद्ध झाले. हॅरिस यांनी चर्चेदरम्यान ट्रम्प यांना बऱ्याचअंशी त्रस्त करण्यास यश मिळविले, यामुळे त्यांच्या डेमोक्रेटिक पार्टीचे सहकारी सुखावले आहेत. तर चर्चेदरम्यान ट्रम्प हे बचावात्मक भूमिकेत होते असे रिपब्लिकन नेत्यांनीही मान्य केले आहे.
सर्वेक्षणांमध्ये आघाडी
ऑनलाइन सर्वेक्षण करविणाऱ्या प्रेडिक्टइटने चर्चेनंतर ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता 52 टक्क्यांवरून कमी करत 47 टक्के होत असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे हॅरिस यांच्या विजयाची शक्यता 55 टक्के असल्याचे नमूद पेल आहे. ट्रम्प यांनी अलिकडच्या काळात हॅरिस यांच्यावर वांशिक टिप्पणी केली होती. चर्चेच्या प्रारंभिक क्षणांदरम्यान ट्रम्प हे बऱ्याचअंशी त्या पॅटर्नपासून दूर राहिले. परंतु हॅरिस आक्रमक झाल्यावर ट्रम्पही संतापल्याचे चित्र दिसून आले. आमच्याकडे एक असा व्यक्ती आहे, जो अध्यक्ष होऊ इच्छितो, परंतु स्वत:ची ओळख दर्शवून ही व्यक्ती लोकांना विभागण्याचा प्रयत्न करत आहे, हे एकप्रकारचे संकटच असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले. 2020 च्या निवडणुकीत झालेला पराभव हा गैरप्रकारांमुळेच झाला होता याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला आहे.
गर्भपाताच्या मुद्द्यावरून अडचणीत
हॅरिस यांनी गर्भपाताच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांना लक्ष्य केले आहे. ट्रम्प हे महिलाविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प हे गर्भपातावर राष्ट्रीय बंदी घालण्याच्या निर्णयाचे समर्थन करतील असा दावा हॅरिस यांनी केला. हॅरिस आणि डेमोक्रेट शिशूहत्येचे समर्थन करतात असा आरोप ट्रम्प यांनी केला. अर्थव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान हॅरिस यांनी विदेशी वस्तूंवर अधिक कर लादण्याच्या ट्रम्प यांच्या योजनेवर निशाणा साधला. तर ट्रम्प यांनी बिडेन प्रशासनकाळातील महागाईसाठी हॅरिस यांनाही जबाबदार धरले. दोन्ही उमेदवारांनी इस्रायल-गाझा युद्ध आणि युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणावरून तीव्र टिप्पणी केली. परंतु कुठल्याही उमेदवाराने हा संघर्ष कशाप्रकारे समाप्त करणार याविषयी कुठलीच विशेष माहिती देणे टाळले आहे.
ट्रम्प पुतीनसमर्थक : हॅरिस
ट्रम्प हे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची बाजू घेण्यासाठी युक्रेनला देण्यात आलेले अमेरिकेचे समर्थन मागे घेण्याकरता तयार असल्याची टीका हॅरिस यांनी केली आहे. तर हॅरिस या इस्रायलचा द्वेष करतात असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. एबीसी न्यूजकडून आयोजित ही चर्चा फिलाडेल्फियाच्या नॅशनल कॉन्स्टिट्यूशन सेंटरमध्ये पार पडली. यादरम्यान सभागृहात प्रेक्षक उपस्थित नव्हते.