महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कमला हॅरिस नवा इतिहास घडवणार?

06:08 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजकीय क्षेत्रात कधी कधी हुकलेली संधी अनपेक्षीतपणे पुन्हा प्राप्त होऊ शकते. राजकारण ही अशी अस्थिर व्यवस्था आहे की, जेथे परिस्थितीस कधीही नाट्यामय कलाटणी मिळू शकते. कमला हॅरिस यांना याचा यथार्थ अनुभव अलीकडेच आला आहे. आणखी अडीच महिन्यानंतर 5 नोव्हेंबरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक आहे. खरेतर यापूर्वी 2020 साली झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षातर्फे लढण्यास उत्सुक होत्या. परंतु पक्षांतर्गत निवडीत जो बायडेन यांची सरशी झाली. बायडेन यांनी रिपब्लीकन  पक्षाच्या ट्रम्प यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले. कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. अमेरिकन राजकारणाच्या बदललेल्या आणि बिघडलेल्या अवस्थेत बायडेन यांना देशाने पसंती दिली. म्हणूनच नव्या महत्त्वाकांक्षा घेऊन यावेळी रिंगणात उतरलेल्या ट्रम्प यांचा पुन्हा पराभव बायडेनच करू शकतील, असा गाढ विश्वास त्यांच्या पक्षास होता. परिणामी, आगामी निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी निश्चित झाली. मात्र आतापर्यंतच्या निवडणूकपूर्व चाचण्यांतून ट्रम्प यांच्या विजयाचे संकेत मिळत गेले. त्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये पुनश्च: ट्रम्प यांचा शिरकाव होऊन चार वर्षांपूर्वीच्या कुशासन, गोंधळ आणि एकाधिकारशाहीची पुनरावृत्ती होईल अशी भीती डेमोक्रॅटिक पक्ष, त्याचप्रमाणे युरोप व अन्य लोकशाहीवादी देशांनाही वाटू लागली.

Advertisement

अशा नाजूक परिस्थितीत अमेरिकन निवडणूक प्रक्रियेप्रमाणे 27 जून रोजी बायडेन व ट्रम्प पहिल्या वाद-प्रतिवाद फेरीसाठी एकाच मंचावर आले. अध्यक्षपदासाठीचे हे वैचारिक द्वंद डेमोक्रॅटिक समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे ठरले. जो बायडेन विसरत होते, अडखळत होते. वयाचा त्यांच्या स्मरणशक्तीवर झालेला दुर्देवी परिणाम स्पष्टपणे दिसून येत होता. 81 वर्षांचे विद्यमान अध्यक्ष संभाव्य दुसऱ्या मुदतीचा कार्यभार सांभाळण्यास सक्षम नाहीत. हे दाबलेले वास्तव यातून उघड्यावर आले. त्यानंतरचे तीन आठवडे डेमाक्रॅटिक पक्षाने अक्षरश: गलीतगात्र स्थितीत काढले. जुलैच्या मध्यापर्यंत पक्षाचा विश्वास आपण गमावला असे दिसताच बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या अनपेक्षित घडामोडीतून पर्यायी उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांचे नाव पुढे आले. त्यांना हवी असलेली संधी त्यांच्यापुढे चालून आली. तथापि, डेमाक्रॅटिक पक्षात पसरलेली निराशा आणि ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षात उंचावलेल्या आशा ही बिकट परिस्थितीही हॅरिस यांच्यापुढे वाढून ठेवली होती.

Advertisement

कौतुकाची बाब ही की, सारा गतइतिहास मागे टाकून कमला हॅरिस या आता मोठ्या धडाक्याने प्रचार कार्यास गती देताना दिसताहेत. सक्रिय झाल्यानंतर आठवड्याभरातच त्यांनी निवडणूक प्रचारासाठी 200 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे. जवळपास 1,70,000 लोकांनी त्यांच्या प्रचार कार्यात स्वयंसेवक होण्यासाठी स्वाक्षऱ्या देऊन स्वीकृती दर्शविली आहे. त्यांच्या अशा चैतन्यदायी आगमनाने डेमोक्रॅटिक पक्ष कार्यकर्त्यांत आणि मतदारात नवा उत्साह व उमेद निर्माण झाली आहे. आतापर्यंतच्या निवडणूकपूर्व चाचण्यांत रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प यांच्या बाजूने जो कल होता तो देखील डेमोक्रॅटिक पक्षाने हॅरिस यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर बदलला. मान्यवर संस्थांच्या चाचण्यांनुसार हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर 4 ते 6 टक्क्यांपर्यंत आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे, गेल्या निवडणुकीत अटीतटीची लढत झालेल्या मिशिगन, नेवाडा, अॅरिझोना, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, व्हिस्कॉन्सिन, पेनसिल्वेनिया या राज्यांतून देखील हॅरिस यांनी कमी फरकाने का असेना पण ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळवल्याचे दिसते.

पेशाने आरंभी वकील असलेल्या कमला हॅरिस या आक्रमक प्रतिवादासाठी प्रसिद्ध आहेत. प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा त्या 18 वर्षांने तरुण आहेत. त्यांना प्रचारासाठी मिळालेला कालावधीही तसा कमीच आहे. हॅरिस यांच्या वरिष्ठपदी राहिलेल्या बायडेन यांची अध्यक्षपदाची कारकीर्द फारशी चमकदार नसली तरी ट्रम्प यांच्यासारख्या बेभरवशाच्या नेत्यास जगातील महासत्तेची सुत्रे देण्यापासून वंचित ठेवणारी मध्यम स्वरुपाची कामगिरी करणारी ठरली होती. त्याच्या कारकीर्दीत वाढती महागाई हा प्रमुख मुद्दा होता. आता ट्रम्प यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी तो आहे. देशाच्या आर्थिक स्थितीवर जे सर्वेक्षण झाले होते, त्यातून बायडेन राजवटीपेक्षा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेस अधिक चांगल्या स्थितीत आणू शकतात, असे निष्पन्न झाले होते. अशा स्थितीत आर्थिक विषयावर मतदारांचा कल वळवू शकेल, असे विश्वासार्ह धोरण मांडणे हॅरिस यांच्यासाठी अपरिहार्य बनले आहे. स्थलांतराचा विषय बायडेन प्रशासनाच्या काळात चिघळला होता. 2023 साली तर अवैध स्थलांतराने विक्रमी आकडा गाठला होता. तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या अखत्यारित सीमा सुरक्षेचा मुद्दा नसला तरी रिपब्लिकन पक्षाने याबाबत त्यांना टीकेचे लक्ष्य बनवले होते. ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात दक्षिणेकडून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मेक्सिको सीमारेषेवर भिंत उभारण्याची घोषणा करून लोकप्रियता मिळवली होती. अशावेळी स्थलांतराच्या ज्वलंत समस्येवर कमला हॅरिस यांना निश्चित व पटेल अशी भूमिका पुढील प्रचारात घ्यावी लागणार आहे. महिलांना नको असलेल्या अपत्यासाठी शल्यचिकित्सेचे स्वातंत्र्य देण्यास डेमोक्रॅटिक पक्षाचा पाठिंबा आहे. ट्रम्प यांनी आपल्या मागील कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाद्वारे हे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. स्वत: महिला असलेल्या हॅरिस यांना या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. करप्रणालीबाबत कॉर्पोरेट क्षेत्रासाठी वाढीव उत्पन्न कर, अती श्रीमंतावर अधिक करभार, करचुकवेगिरीस आळा व कमी उत्पन्नदार कुटुंबांना कर सवलती या पक्ष धोरणाचे फायदे हॅरिस यांना कटाक्षाने मतदारांवर बिंबवावे लागतील. यासह आरोग्य व्यवस्था, शस्त्र बाळगण्याचे कायदे, देशांतर्गत गुन्हेगारी, विदेशी धोरण, पर्यावरण यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरील पुढील प्रचारात प्रभावी भाष्य त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

उपनगरातील महिला वर्ग हा अलीकडच्या काळात डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजयास हातभार लावणारा मोठा घटक ठरला आहे. 2016 साली जेव्हा हिलरी क्विंटन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी लढत झाली, तेव्हा क्लिंटन यांच्या विजयाच्या शक्यतेमुळे हा वर्ग बराच गाफिल राहिला. काही महिलांनी क्लिंटन यांना मतदान केले तर बऱ्याच घरीच राहिल्या. परंतु प्रत्यक्ष निकालानंतर क्लिंटन यांचा पराभव झालेला पाहून महिला वर्गात इतका खेद व हळहळ पसरली की, बऱ्याचजणी रातोरात डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्या बनल्या. आता कमला हॅरिस यांच्या रुपात पुन्हा एकदा एक महिला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. प्रतिस्पर्धी आधीचाच आहे. अशावेळी उपनगरीय महिलांनी पूर्वीची चूक सुधारण्याची संधी जर पूर्ण क्षमतेने घेतली तर विजयाचे पारडे हॅरिस यांच्या बाजूने झुकण्याची दाट शक्यता  आहे. ट्रम्प यांनी ताज्या निवडणूक प्रचारात ‘ती आधी भारतीय होती, आता अचानक ती काळी झाली’ असे म्हणत हॅरिस यांच्यावर वर्णद्वेषी टीका केली आहे. कारण जेव्हापासून हॅरिस यांनी उमेदवारी स्वीकारली आहे. तेव्हापासून त्यांना ‘बायडेन’ यांच्या तुलनेत कृष्णवर्णीयांचा पाठिंबा आकडेवारीनुसार वाढला आहे. अमेरिकन निवडणुकांमध्ये कृष्णवर्णीय, दक्षिण आशियाई, हिस्पॅनिक लोकांची मोठी मतपेढी आहे. ती जर कमला हॅरिस यांनी आपल्याकडे खेचली तर समिकरणे निर्णायकरित्या बदलू शकतात. सारी गणिते नीट जुळून आली तर अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकतात.

- अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article