भाषा वादात कमल हासन यांची उडी
‘हिंदिया’ निर्माण करण्याचा डाव : केंद्राला केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ चेन्नई
देशाच्या दक्षिणेतील राज्यांवर कथित स्वरुपात हिंदी लादण्याचा आणि परिसीमनाद्वारे हिंदीभाषिक पट्ट्याच्या हितांना बळ देण्याचा आरोप अभिनेते कमल हासन यांनी केला आहे. हासन यांनी याकरता ‘हिंदिया’ या शब्दाचा वापर केला आहे. केंद्र सरकार हिंदिया निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका कमल यांनी केली आहे. 2026 मध्ये प्रस्तावित परिसीमनाबद्दल निर्णय घेण्यात आल्यास तो बिगरहिंदी भाषिक राज्यांच्या हिताचा नसेल असा दावाही त्यांनी केला आहे.
लोकसभा मतदारसंघच्या परिसीमनाचा प्रयत्न केल्यास भारताची संघीय रचना आणि विविधतेला नुकसान पोहोचू शकते. भारताच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनाला धोक्यात आणत याला हिंदिया केले जात असल्याचा आरोप कमल हासन यांनी केला आहे.
लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाच्या परिसीमनाचा मुद्दा केवळ तामिळनाडूसाठी चिंतेचा विषय नाही. हा आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्येतील राज्यांनाही प्रभावित करतो. लोकसंख्या वाढ नियंत्रित करत राष्ट्रीय विकासात सहकार्य करणाऱ्या राज्यांना दंड दिला जाऊ नये. लोकशाही अन् संघवाद या दोन प्रमुख तत्वांवर लक्ष केंद्रीत केले जावे. या दोन्ही तत्वांना महत्त्व देऊनच आम्ही एक समावेशक आणि विकसित भारताच्या स्वप्नाला प्राप्त करू शकतो असे वक्तव्य कमल हासन यांनी केले आहे.
आम्ही एक समावेशक भारताची कल्पना करतो, परंतु केंद्र सरकार हिंदिया निर्माण करु पाहत आहे. एक कार्यशील लोकशाहीला वारंवार रोखण्याची कुठलीच गरज नाही. मतदारसंघांची पुनर्रचना कुठल्याही प्रकारे करण्यात आली तरीही सर्वाधिक प्रभावित नेहमीच बिगरहिंदी भाषिक राज्ये ठरणार आहेत. हे पाऊल संघवादाला कमकुवत करते आणि पूर्णपणे अनावश्यक आहे. केवळ आजच नव्हे तर कायम संसदीय प्रतिनिधींची संख्या अपरिवर्तित ठेवणे लोकशाही, संघवाद आणि भारताच्या विविधतेला कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. एक भारतीय म्हणून यावर मी जोर देतो असे कमल हासन म्हणाले.