For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कल्याण बॅनर्जी लोकसभेतून निलंबित

01:09 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
कल्याण बॅनर्जी लोकसभेतून निलंबित
Advertisement

ऊर्वरित वर्षाकालीन अधिवेशन काळासाठी निर्णय

Advertisement

► वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे विश्वासू कल्याण बॅनर्जी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला असून तो सध्या होत असलेल्या वर्षाकालीन अधिवेशनापुरता आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यांनी तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या काही खासदारांना उद्देशून ‘चोर’ हा असांसदीय शब्द उपयोगात आणल्याने त्यांच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

बुधवारी सकाळच्या सत्रात लोकसभेत कल्याण बॅनर्जी आणि एनसीपीआय पक्षाच्या तीन सदस्या मिताली बाघ, शताब्दी रॉय आणि काकोली घोष यांच्यात जोरदार शब्दयुद्ध झाले. या सर्व तीन महिला खासदार पूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी अन्य 17 लोकसभा सदस्यांसमवेत एनसीपीआय पक्षात प्रवेश केला. या पक्षाने नंतर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला समर्थन दिले.

चोर असा उल्लेख

कल्याण बॅनर्जी मात्र या साऱ्या घटनाक्रमात ममता बॅनर्जी यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यांचा बुधवारी संसदेत या तीन महिला खासदारांशी वाद झाला. त्यात बॅनर्जी यांनी पक्ष सोडलेल्या खासदारांना उद्देशून चोर या शब्दाचा प्रयोग केल्याने वातावरण भडकले. अनेक इतर खासदारांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नंतर या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे बॅनर्जी यांच्या वर्तनाविरोधात तक्रार केली. बिर्ला यांनी या कल्याण बॅनर्जी यांना वर्षाकालीन अधिवेशनातच्या ऊर्वरित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

ममता बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी यांच्यात मतभेद ?

कल्याण बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांच्याशी एकनिष्ठ असले, तरी दोन्ही नेत्यांचे मतभेदही जाहीररित्या समोर आले आहेत. पश्चिम बंगालमधील एका जाहीर कार्यक्रमात कल्याण बॅनर्जी भाषण करत असताना, ममता बॅनर्जी यांनी त्यांना मध्येच भाषण थांबविण्याचा आदेश दिला. त्यामुळे नाराज झालेले कल्याण बॅनर्जी सभेतून निघून गेले. त्यामुळे या दोन नेत्यांमध्येही सारेकाही अलबेल नाही, असा संदेश पसरला आहे. मतभेदांचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे दिसते.

Advertisement

.