कर्नाटकाच्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘कळसा-भांडुरा’
पर्यावरण परवाना मिळाल्यास कामासाठी सज्ज
पणजी : कळसा-भांडुरा प्रकल्पातून कर्नाटकसाठी म्हादईचे पाणी वळवण्याची योजना कर्नाटक सरकारने तयार केली असल्याची माहिती त्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अहवालातून समोर आली आहे. कर्नाटकच्या अर्थसंकल्पातून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हादईचे 3.9 टीएमसी पाणी आपल्या राज्याला मिळावे म्हणून योजना आखण्यात आल्याचे म्हटले आहे. ते काम सुरू व्हावे म्हणून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा परवाना मिळण्याची प्रतीक्षा करण्यात येत असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून नमूद केले आहे. केंद्र सरकारने पर्यावरणाचा परवाना दिला तर कर्नाटक सरकारने काम सुरु करण्यासाठी सज्जता ठेवली आहे. हा परवाना मिळावा म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार दिल्ली दौरा करीत आहेत. त्यांचे खासदारही या प्रकरणी पाठपुरावा करीत आहेत. गोव्यात मात्र यासंदर्भात सामसूम दिसत असून या विषयाकडे सरकारचे लक्ष दिसत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.