महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

झारखंड मुख्यमंत्रिपदी कल्पना सोरेन यांचं नाव चर्चेत ! हेमंत सोरेन यांच्या अटकेवर पर्यायी व्यवस्था

06:42 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी, अटक होण्याच्या शक्यतेने पर्यायी व्यवस्था

Advertisement

वृत्तसंस्था / रांची

Advertisement

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप असून त्यासंदर्भात प्रवर्तन निदेशालय (ईडी) त्यांची चौकशी करणार आहे. या चौकशीचा प्रारंभ आज बुधवारी दुपारी 1 वाजता होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असून तसे झाल्यास त्यांच्या पत्नी कल्पना यांना झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आणण्याची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात या राज्याची राजधानी रांची येथे मंगळवारी झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांची बैठक घेण्यात आली होती.

मंगळवारी दिवसभर सोरेन आणि ईडीचे अधिकारी यांच्यात पाठशिवणीचा नाट्यामय खेळ होत राहिला. निदेशालयाचे अधिकारी त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी सकाळी पोहचले, तेव्हा ते तेथे नव्हते. ते नेमके कोठे गेले आहेत याची माहितीही अधिकाऱ्यांना मिळत नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानांवर लक्ष ठेवतानाच झारखंड आणि दिल्ली येथील विमानतळांवरही पहारा ठेवला होता. पण ते विमानतळांवर दिसून आले नाहीत. त्यांनी अज्ञान स्थानी जाण्यासाठी कारचा उपयोग केल्याचे नंतर समजून आले. एका दिवसात त्यांनी कारने जवळपास 1,200 किलोमीटरचा प्रवास केल्याचेही नंतर स्पष्ट झाले. अखेर ते मंगळवारी संध्याकाळी पुन्हा आपल्या अधिकृत निवासस्थानी परतल्यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस दिली. हेमंत सोरेन हे सोमवारीच बेपत्ता झाले होते. जवळपास 30 तास त्यांचा ठावठिकाणा नव्हता, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी नंतर पत्रकारांना दिली.

आज चौकशी होणार

सोरेन यांची चौकशी आज बुधवारी दुपारी 1 वाजता केली जाणार आहे. यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नावली सज्ज केली असून ही चौकशी मुख्यमंत्री कार्यालयात केली जाईल. सोरेन यांनी चौकशीला सामोरे जाण्यास मान्यता दिली असून ते आज बुधवारी निर्धारित वेळेत कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

अटक होण्याची शक्यता

हेमंत सोरेन यांच्याविरोधात ईडीकडे भक्कम पुरावे आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी चौकशीत सहकार्य न केल्यास किंवा ईडीच्या प्रश्नांची सुसंबद्ध उत्तरे न दिल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते. ईडी त्यानंतर त्यांची कोठडी मागण्याचा प्रयत्न न्यायालयाच्या माध्यमातून करु शकते.

रांचीत जमावबंदी आदेश

सोरेन यांची चौकशी होत असताना राजधानी रांचीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी जमावबंदी आदेश आतापासूनच लागू करण्यात आला आहे. त्यामुळे चारपेक्षा अधिक लोकांनी घोळका करुन थांबण्यावर किंवा फिरण्यावर बंदी घोषित करण्यात आली. कायदा सुव्यवस्था प्रश्न हाताळण्यासाठी प्रशासनाने सर्व सज्जता ठेवली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

कल्पना सोरेन सांभाळणार सूत्रे ?

हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घ्यावीत अशी सज्जता करण्यात आली असल्याचे समजते. सोरेन यांना अटक झालीच तर कल्पना या मुख्यमंत्री होतील. झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांनी या व्यवस्थेला मान्यता दिल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मात्र, काही आमदार नाराज असल्याचेही बोलले जात आहे. राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार असून काँग्रेसचीही कल्पना सोरेन यांच्या मुख्यमंत्रीपदाला मान्यता आहे. कल्पना सोरेन या हेमंत सोरेन यांना अटक होण्यापूर्वी मुख्यमंत्री होणार की, अटक झाल्यानंतर होणार, हा प्रश्न सध्या रांची आणि दिल्लीत चर्चिला जात आहे.

काय आहे प्रकरण ?

सोरेन यांच्यावर कोळसा खाणींचे वितरण अवैधरित्या करुन प्रचंड बेहिशेबी पैसा गोळा केल्याचा आरोप आहे. तसेच कमी दरात भूखंड खरेदी करुन ते प्रचंड दरात विकून बेहिशेबी उत्पन्न मिळविल्याचाही आरोप आहे. काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रकरणात (मनी लाँड्रिंग) त्यांच्यावर तीन प्रकरणे सादर करण्यात आली असून त्यांच्या विरोधात मजबूत पुरावे आहेत, असे ईडीचे म्हणणे आहे.

 सात आमदार अनुपस्थित

झारखंड मुक्ती मोर्चाच्या मंगळवारच्या बैठकीला या पक्षाचेच सात आमदार अनुपस्थित होते, असे वृत्त आहे. या अनुपस्थित आमदारांपैकी तीन आमदार हे हेमंत सोरेन यांच्या घराण्यातीलच आहेत. त्यांचा कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्रिपद देण्यास विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. त्यामुळे पक्षातच गोंधळाचे वातावरण असून पक्षात फूटही पडू शकते, अशीही चर्चा आहे.

रांचीत उत्कंठावर्धक घडामोडी

ड सोमवारपासून मंगळवार संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री सोरेन बेपत्ता

ड सोरेन संशयित असणाऱ्या घोटाळ्याची व्याप्ती 10 हजार कोटी

ड ईडी अधिकाऱ्यांकडून सोरेन यांचा अनेक स्थानांवर कसून शोध

ड अखेर मंगळवारी संध्याकाळी सोरेन मुख्यमंत्री निवासात उपस्थित

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article