आगीतही ‘कालीमाता’ सुरक्षित
ही घटना मध्यप्रदेश राज्यातील मैहर जिल्ह्यातील अमरपाटण येथील आहे. काही दिवसांपूर्वी नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी कालीमातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा कार्यक्रम होत असताना, अपघाताने या मूर्तीला आग लागली. पाहता पाहता ती मोठ्या प्रमाणात भडकली. आता मूर्तीचे काय होणार, याची चिंता विसर्जनाच्या मिरवणुकीत समाविष्ट झालेल्या सर्वांना वाटू लागली. आग विझवण्यासाठीची व्यवस्था त्यांच्यापाशी नव्हती. त्यामुळे आगीचा बंब येईपर्यंत मूर्ती सुस्थितीत राहणे शक्य नाही, अशीच त्यांची भावना झाली. आता कालीमातेचा शाप लागून काहीतरी अघटित घडणार, अशा चिंतेनेही त्यांच्या मनात घर केले.
आग विझविण्यासाठी विसर्जन मिरवणुकीतील अनेकांनी त्यांना शक्य होते तेव्हढे प्रयत्न केले. पण आग भडकतच चालली होती. आता त्यांच्या चिंतेची जागा कालीमातेचा कोप होणार, या भीतीने व्यापली होती. तथापि, काही वेळाने जेव्हा आगीच्या ज्वाळा मंदावल्या, तेव्हा त्यांना जे दृष्य दिसले ते पाहून त्यांना सुखदाश्चर्याचा धक्का बसला. कारण एवढ्या भीषण आगीतही कालीमातेची मूर्ती जशीच्या तशी होती. तिला काहीही झाले नव्हते. त्यामुळे नंतर विसर्जनाचा कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याविना पार पडला. या घटनेची चर्चा आता सर्वत्र होत आहे. असे कसे घडले यावर विविध लोक विविध मते व्यक्त करीत आहेत. ही घटना हा कालीमातेनेच घडविलेला चमत्कार आहे, अशी स्थानिकांची भावना आहे.