20 नोव्हेंबरला येतोय ‘काली खेती’
चालू महिन्यात एक भयपट प्रदर्शित होणार असून त्यात एका गावातील सुपरनॅचरल कहाणी दाखविण्यात येणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली असून यात जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत. जॅकी श्रॉफ यांनी ‘काली खेती’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अंधार, कंदिल आणि राक्षस दाखविण्यात आला आहे.
प्रकाश विझू देऊ नका, शेती जागणार आहे अशी कॅप्शन जॅकी श्रॉफने पोस्टरला दिली आहे. तसेच चित्रपटातील कलाकारांची नावे उघड करण्यात आली आहे. यात नेहा सरगम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज खानने केले असून त्यानेच याची कहाणी लिहिली आहे. ब्लॅककॅनव्हास स्टुडिओच्या बॅनर अंतर्गत निर्माण होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती सना खान करत आहे. हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने काली खेती या चित्रपटाला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही कारणांमुळे निर्मात्यांनी याचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
