राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत वेत्येच्या कलेश्वर संघाची बाजी
कुडाळचा सिध्दीविनायक रायवाडी संघ उपविजेता ; हिर्लोक येथे स्पर्धेचे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
हिर्लोक शिवाजी हायस्कुलच्या पटांगणावर पार पडलेल्या राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील वेत्येचा कलेश्वर संघ विजेता ठरला. रोख रू १० हजारच्या बक्षीसासह व चषकाचा मानकरी ठरला. तर कुडाळ येथील रायवाडी सिध्दीविनायक संघ उपविजेता ठरला असून रोख रू ५ हजार व चषक पटकाविला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या मान्यतेने व सावंतवाडी मित्रमंडळ आणि कुडाळ तालुका रस्सीखेच संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यालय हिर्लोक येथील पटांगणावर जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत पंढरीनाथ सावंत, सुभाष सावंत, अनिकेत सावंत, तेजस सावंत, उदय सावंत, बाजीराव झेंडे, अनंत सावंत, रस्सीखेच संघटनेचे सचिव किशोर सोन्सुरकर, पंच हेमंत नाईक यांचा समावेश होता.
या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण, कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील आठ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अटीतटीच्या झालेल्या सामन्यांत सावंतवाडी वेत्येच्या कलेश्वर संघ विजेता ठरला. त्याने रोख रू १० हजार रूपये व चषक पटकाविला तर कुडाळ रायवाडीचा सिध्दीविनायक संघ उपविजेता ठरला. त्याने रोख रू. ५ हजार व चषक पटकाविला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून रस्सीखेच संघटनेचे सचिव किशोर सोन्सुरकर व हेमंत नाईक यांनी काम पाहिले.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, कुडाळ रस्सीखेच संघटनेचे सुभाष सावंत व बाजीराव झेंडे, यांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या अन्य सहा संघांना प्रमाणपत्र व चषक देवून गौरविण्यात आले. यावेळी पंढरीनाथ सावंत, अनिकेत सावंत, तेजस सावंत, उदय सावंत, बाजीराव झेंडे, अनंत सावंत, जयंत चमणकर आदींचा समावेश होता.
लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धा भरविणार-जयप्रकाश चमणकर
रस्सीखेच हा भारतीय खेळ आहे. या खेळाला आता ऑलंपिक स्तरावर मान्यता मिळालेली आहे. दोन वर्षापुर्वी सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेतर्फे वेळागर येथे राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेत मुंबई उपनगर, ठाणे, पुणे या बलाढ्य संघांना हरवत सिंधुदुर्ग रस्सीखेच संघाने विजेतेपद पटकाविले होते. त्यामुळे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात सिंधुदुर्ग संघ निश्चितच बाजी मारू शकतो. महाराष्ट्रात २ वेळा राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धात सिंधुदुर्ग संघाने केलेली कामगिरी व मिळविलेला विजय पहाता. राज्य व राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धात सिंधुदुर्गचा संघ निश्चीतच बाजी मारू शकतो. लवकरच राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धा भरविण्याचा मानस असून सिंधुदुर्गाती रस्सीखेच खेळाच्या स्पर्धकांनी आपला सराव चालू ठेवावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी या खेळाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात केले.