For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Road: कळे-कोल्हापूर मार्गावर अडथळ्यांची शर्यत, वाहनांच्या कोंडीमुळे कुचंबणा

01:17 PM May 25, 2025 IST | Snehal Patil
kolhapur road  कळे कोल्हापूर मार्गावर अडथळ्यांची शर्यत  वाहनांच्या कोंडीमुळे कुचंबणा
Advertisement

या मार्गावरील अर्धा तासाचा प्रवास आता दीड तासांचा झाला आहे.

Advertisement

By : कृष्णात चौगले

कोल्हापूर : फुलेवाडी नवीन नाक्याशेजारी कळे फुलेवाडी महामार्गाचे काम गेल्या महिनाभरापासून रेंगाळले आहे. त्यामुळे दक्षिणेकडील एका बाजुने वाहतूक सुरु आहे. तसेच तेथील खांडसरी चौकातून शिंगणापूरकडे जाणाऱ्या मार्गावरही खोदाई केल्यामुळे अरुंद जागेतून वाहनांना मार्ग शोधावा लागत आहे.

Advertisement

परिणामी कोल्हापूर गगनबावडा मार्गावरून येणारी वाहने आणि शिंगणापूर रोडकडे वळणाऱ्या वाहनांची प्रचंड कोंडी होत असून सुमारे अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी वाहनधारकांना थांबावे लागत आहे. वाहतुकीच्या या कोंडीबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागासह प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनाही कोणतेही सोयरसुतक नाही. त्यामुळे या मार्गावरील अर्धा तासाचा प्रवास आता दीड तासांचा झाला आहे.

जालना येथील व्ही. पी. सेट्टी या ठेकेदार कंपनीकडून कळे ते फुलेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुमारे अडीच वर्षांपासून सुरु आहे. साधारणत: 85 टक्के काम पूर्ण झाले असले तरी ठिकठिकाणी अपूर्ण राहिलेल्या कामामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. कळे-मरळी दरम्यान लहान पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. पण रस्त्याकडेच्या एका बाजूच्या भिंतीचे काम अद्यापही अपूर्ण आहे.

ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले काम आजही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांना गेले वर्षभर पुलाखालून तयार केलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत होता. गेल्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढल्यामुळे ठेकेदार कंपनीने दोन दिवसांपूर्वी पुलावरून वाहतूक सुरु केली आहे.

मोठी वळणे बनली अपघात प्रवण क्षेत्र

भामटे येथील वळण काढणार असल्याचे कंपनीने सुरुवातीस सांगितले होते. पण तेथील वळण कायम आहे. या वळणावरील रस्त्याचे कामही अपूर्ण असल्यामुळे एका बाजूच्या रस्त्यावरून धोकादायक वाहतूक सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अगदी पाणंदीचे स्वरूप आलेल्या येथील रस्त्यावर अनेक वाहनांचे अपघात झाले.

कळंबे तर्फ कळे येथेही रस्त्याचे मोठे वळण निघालेले नाही. तेथे भूसंपादनाचा विषय मार्गी लागला नसल्यामुळे उपलब्ध जागेतूनच रस्ता केला आहे. त्यामुळे तो अरुंद झाला आहे. परिणामी भामटे आणि कळंबे येथील मोठी वळणे अपघात प्रवण क्षेत्र बनली आहेत.

नोकरदार वर्गाची कुचंबणा

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरून कोल्हापूरसह परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या नोकरदारवर्गाची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे सकाळी 9 ते 12 आणि रात्री 6 ते 9 या वेळेत या मार्गावरून वाहनांच्या अक्षरश: रांगा असतात. खांडसरी चौकातील नवीन फुलेवाडी नाक्यावर तर वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या मानांकनानुसार या रस्त्याचे कामकाज झाले नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये चढ-उतार तयार झाले आहेत. तर रस्त्याचे काम सुरु असताना काँक्रीट वाळण्यापूर्वीच त्यावरून मोटरसायकली घातल्यामुळे रस्त्यावर चाकांच्या आकाराची चाकोरी तयार झाली आहे.

त्यामधून प्रवास करणे दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. महामार्गाचे काम अद्याप सुरु असले तरी बालिंगेसह अनेक ठिकाणी हा रस्ता उखडल्याचे चित्र आहे. अन्य राष्ट्रीय महामार्गांच्या तुलनेत या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा वाहनधारकांचा सूर आहे.

दोनवडे ते बालिंगेदरम्यानचा रस्ता बनला ‘डर्ट ट्रॅक’

भोगावती नदीवरील बालिंगे येथील मोठ्या पुलाचे काम दोन वर्षानंतरही अद्याप अपूर्ण आहे. परिणामी दोनवडे फाटा ते बालिंगादरम्यानच्या रस्त्याचेही काम प्रलंबित राहिले आहे. पावसामुळे हा रस्ता ‘डर्ट टॅक“ बनला आहे. या मार्गावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्यामुळे या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. वाहनधारकांना या पाण्यातूनच मार्ग शोधावा लागतो.

दोन दिवसांत प्रश्न मार्गी लागेल

"कळे-फुलेवाडी महामार्गावरील खांडसरी चौकातील उत्तरेकडील बाजूने काँक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. अद्याप त्यावरून रहदारी सुरु नसल्यामुळे शिंगणापूरकडे जाणारी वाहतूक फाट्याच्या पुढील बाजूकडून सुरु आहे. येत्या दोन दिवसांत काँक्रीटच्या नवीन रस्त्यावरून शिंगणापूर फाट्याकडे जाणारी वाहतूक सुरु केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल."

- शुभम पाटील, कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

Advertisement
Tags :

.